देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा सुपूत्र अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. १२ जुलैला अनंत अंबानी राधिका मर्चंट हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सध्या लग्नाची लगबग सुरू असली तरी दुसऱ्या बाजूला लग्नाआधीच्या कार्यक्रमांना जोरदार सुरुवात झाली आहे. जुलै महिना सुरू होताना अनंत-राधिकाच्या लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मुकेश व नीता अंबानींनी लेकाच्या लग्नाआधी ५० गरीब जोडप्यांचं लग्न लावून दिलं. त्यानंतर मामेरू समारंभ पार पडला. या समारंभानंतर गरबा नाईट्सचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर काल, ५ जुलैला मोठ्या थाटामाटात अनंत-राधिकाचा संगीत सोहळा झाला.
मुंबईतील नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटर येथे अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या संगीत सोहळ्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी उपस्थितीत लावली होती. या सोहळ्यात जगप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरने परफॉर्मन्स केला. याशिवाय बॉलीवूडच्या कलाकारांबरोबर अंबानी कुटुंब डान्स करताना पाहायला मिळालं. अनंत-राधिकाच्या या संगीत सोहळ्याची एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने खिल्ली उडवली आहे.
अभिनेता सौरभ गोखलेने अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याविषयी इन्स्टाग्रामवर खिल्ली उडवणारी पोस्ट शेअर केली आहे. सौरभने लिहिलं आहे, “आज एका धनाढ्य कुटुंबातील लग्न समारंभातील नृत्यविष्कार पाहून मला माझ्या छोट्या नुमवि शाळेतील स्नेहसंमेलनातील आमचा नाच आठवला…फरक इतकाच की आम्ही ‘विद्यार्थी’ होतो आणि त्यांना ‘अर्थ-विद्या’ उत्तम येते!” सौरभ गोखलेची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
याआधी अभिनेता सौरभ गोखलेने महाराष्ट्रातील अनधिकृत पब, बारवरील कारवाईबद्दल चपखल पोस्ट लिहिली होती. दरम्यान, ‘राधा ही बावरी’, ‘उंच माझा झोका’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला सौरभ गोखलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं मराठी मालिकांसह अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका निभावल्या होत्या. एवढंच नव्हेतर त्यानं आपल्या अभिनयाची छाप हिंदी सिनेसृष्टीतही उमटवली आहे. तसंच सौरभ मराठी रंगभूमीवरही अविरत काम करत आहे. सध्या त्याचं प्रदीप दळवी लिखित व विवेक आपटे पुनदिग्दर्शित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटक रंगभूमीवर सुरू आहे. या नाटकात त्यानं मुख्य नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. यात सौरभसह आकाश भडसवाळे, चिन्मय पाटसकर, अमित जांभेकर, सुजित देशपांडे, तेजस बर्वे, स्वप्नील कुलकर्णी, गौरव निमकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.