अनेक मराठी कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय विषयांवरची त्यांची मतं मांडत असतात. मराठी अभिनेता सौरभ गोखले (Saurabh Gokhale Post) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सौरभने मराठी नाटकांमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा सौरभ त्याची मतं सोशल मीडियावर मांडत असतो. आता त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर केलेल्या एका पोस्टची खूप चर्चा होत आहे.
सौरभने स्टोरीमध्ये मराठी हॉटेल मालकांच्या परप्रांतीय कर्मचाऱ्यांबद्दल टिप्पणी केली आहे. मालक हॉटेलात नसेल तर हे कर्मचारी बेताल व बेलगाम असतात, असं सौरभने म्हटलं आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
सौरभची पोस्ट नेमकी काय?
“मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर, क्लिनर, मॅनेजर हे मालक हॉटेलात नसताना धोतराच्या सुटलेल्या कासोट्यासारखे असतात. बेताल..बेलगाम…
वेळीच जागच्या जागी जागच्या जागी खोचला नाही तर तो पायात अडकून मालकाला तोंडावर पाडतो, नाहीतर चारचौघात मालकाचं धोतर सोडतो,” असं सौरभने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच वाचकांनी या हॉटेलचे नाव ओळखल्यास त्यांना शेजारच्या हॉटेलमध्ये फिंगर बाऊल फ्री, असंही त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, सौरभ गोखलेने त्याला आलेल्या अनुभवाबद्दल ही पोस्ट शेअर केली, असावी असं दिसत आहे. मात्र, त्याने पोस्टमध्ये तसं काहीच सांगितलं नाही. त्याची ही पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यावर लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी सौरभच्या पोस्टचे समर्थन केले आहे. सौरभच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने ‘योद्धा’, ‘सर्व लाइन व्यस्त आहेत’, ‘राधा ही बावरी’, ‘तलाव’, ‘परतू’ यामध्ये काम केलं आहे.