महाराष्ट्रातील राजकारणात २ जुलैला मोठा भूकंप झाला. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करीत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यावेळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच त्यांच्याबरोबर बंड केलेल्या राष्ट्रवादीतल्या इतर नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या राजकीय भूकंपावर मनोरंजसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे आपली मते मांडली. त्यानंतर आता अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी राजकीय पार्श्वभूमीवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला मोलाचा सल्ला दिला आहे.
या व्हिडीओत सयाजी शिंदे काही गावकऱ्यांबरोबर दिसत आहेत. त्यांच्यामागे घनदाट झाडी आहे. व्हिडीओतून सयाजी शिंदे म्हणतात, “महाराष्ट्रातल्या सगळ्यांना शुभ सकाळ. उठलात?.. आता सगळ्यांनी झोपा आणि कुठल्याही पक्षाला फॉलो करू नका. जर कुठल्या पक्ष्याला फॉलो करायचंच असेल, तर घुबडाला करा.” सयाजी शिंदेंच्या या मजेशीर व्हिडीओला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चाहत्यांनी कमेंटद्वारे सहमतीही दर्शवली आहे.
हेही वाचा – Bigg Boss OTT 2 मधून बाहेर पडताना आकांक्षा पुरीला मिळाली अपमानास्पद वागणूक; म्हणाली, “सलमान खानने….”
हेही वाचा – “हिंदू धर्माचा अपमान…,” OMG 2 मधील अक्षय कुमारचा लूक पाहून नेटकऱ्यांचा संताप
यापूर्वी सयाजी शिंदे यांनी राजकीय परिस्थितीवर काहीही न लिहिता, एक व्हिडीओ शेअर केला होता. जो ‘मी पुन्हा येईन’ या वेब सीरिजमधला एक सीन होता. या व्हिडीओत काही पत्रकार हे सयाजी शिंदेंना प्रश्न विचारताना दिसत आहेत. एक महिला पत्रकार विचारते, ‘मुख्यमंत्रीपदाचा काय खेळ चालू आहे, हे जनतेला नको कळायला?’ यावर सयाजी शिंदे म्हणतात की, ‘कशाला कळायला पाहिजे? रात्री काय झालं?, मध्यरात्री काय झालं?, पहाटे काय झालं?, सकाळी काय झालं? यात जनतेचा काय संबंध?’ तर दुसरा पत्रकार विचारतो, ‘सर, तुमचं बरोबर आहे; पण लोकशाही आहे.’ यावर सयाजी शिंदे म्हणतात, “आमदार, खासदार यांना निवडून देण्याइतपत जनतेचा संबंध येतो. पंतप्रधान, मुख्यमंत्री निवडून देणं हे पक्षाचं काम आहे. जनतेला कोणी विचारतं का, की बाबा कुठला मुख्यमंत्री हवाय? भाषणात ठीक आहे; लोकांचं राज्य आहे. जनतेच्या हातात नाड्या आहेत.’ दरम्यान, सयाजी यांचा हा व्हिडीओ राजकीय भूकंपाच्या दिवशी चांगलाच व्हायरल झाला होता.