‘दामन’, ‘कॉकटेल’, ‘भिकारी’, ‘पँथम’, ‘औरों में कहाँ दम था’, ‘लोच्या झाला रे’, ‘एकदा येऊन तर बघा’, ‘घर बंदुक बिर्याणी’, ‘ढोलकी’, ‘दोन घडीचा डाव’, ‘अबोली’, ‘आधारवड’ अशा अनेक चित्रपटांतून अभिनेते सयाजी शिंदे(Sayaji Shinde) यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी मराठीसह हिंदी, तमिळ चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. आता एका मुलाखतीत त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना एक सल्ला दिला आहे.

मी ५० हजारांत…

लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत नवीन कलाकारांना उद्देशून ते म्हणाले, “ज्यांना कलाकार बनायचं आहे, त्या तरुण-तरुणींनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की, समोरच्याला तुमचा फायदा असेल तरच ते तुम्हाला घेतात. मला इंडस्ट्रीमध्ये यायची इच्छा आहे, मला साऊथमध्ये यायची इच्छा आहे, असे अनेक जण म्हणतात; कोण विचारतंय तुम्हाला? ते आपल्यासाठी पायघड्या घालून बसले नाहीत. तुमचा त्यांना काहीतरी फायदा होत असेल तर ते तुम्हाला घेतील. तुमच्यामुळे त्यांचा यशस्वी होण्याचा टक्का वाढणार आहे. आमच्याकडे टॅलेंट आहे, असा गैरसमज असतो. आमचं नशीबच चांगलं नाही, या सगळ्या गोष्टी स्वत:ला कुरवाळण्याच्या आहेत. प्रॅक्टिकली तसं काही नाही. मी असं म्हणतो की, आपण काम मागायला जायचं ते कलाकारांनी नसतं जायचं, म्हणजे त्यांना योग्य वाटत असेल तर ते आपल्याला भूमिका देतीलच. आपण खूप चांगलं असलं पाहिजे आणि आपण त्यांची गरज व्हायला पाहिजे, तेव्हा ते आपल्याला घेतात.”

पुढे सयाजी शिंदे म्हणाले, “मला पहिली तामिळ चित्रपटाची ऑफर मिळाली, ती फिल्म कमल हसनला करायची होती. मला सांगितलं की, या फिल्मसाठी तुम्हाला पाच लाख रुपये देऊ. मी विचार केला की मी ५० हजारांत ही भूमिका करायला तयार आहे, अशी भूमिका कोण सोडेल? ज्याच्यासाठी आपण वाट बघत होतो, इतकी छान भूमिका आहे. नंतर माझ्या लक्षात आलं की, कमल हसन यांनी या भूमिकेसाठी लाखो-करोडो घेतले असते. मला पाच लाखच खूप वाटले होते, त्यामुळे मनाचा खेळ आहे. तुमच्याकडे सायकल आहे आणि तुम्हाला जर मोटरसायकल मिळाली तर तुम्हाला बरंच वाटणार आहे.”

सयाजी शिंदे यांनी या मुलाखतीत त्यांच्या बालपणाविषयी, आई-वडिलांबाबत, त्यांच्या अभिनय क्षेत्रातील त्यांचा प्रवास, अनेक किस्से, अनुभव व्यक्त केले. सयाजी शिंदे यांनी मराठी बॉलीवूडमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केले आहे. त्यांच्या खलनायकांच्या भूमिकांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाल्याचे पाहायला मिळते. तसेच तमिळ चित्रपटसृष्टीतही सयाजी शिंदे यांनी त्यांचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. लवकरच ते पावटॉलॉजी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट ११ एप्रिल २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.