काँग्रेस नेते राहुल गांधींना २०१९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरुन केलेल्या वक्तव्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर राहुल गांधींची खासदारकीही रद्द करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणानंतर राहुल गांधींनी “माफी मागायला मी सावरकर नाही” असं वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा करत भारतीय जनता पार्टी राहुल गांधींविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सावरकरांच्या सन्मानार्थ भाजपा शिवसेना(शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी मिळून राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. या गौरव यात्रेत भाजपा व शिंदे गटाचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या १०२ वर्षांच्या आजीनेही या यात्रेत सहभाग घेतला आहे. शरद पोंक्षेंनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

हेही वाचा>> “वीर सावरकरांचा अपमान करणारा एकही…” गौरव यात्रेद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

हेही वाचा>> “त्यांना महात्मा गांधींच्या…”, एकेरी उल्लेख करत शरद पोंक्षेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले, “वीर सावरकर अन्…”

शरद पोंक्षेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत सहभागी झालेल्या त्यांच्या आजीचे फोटो शेअर केले आहेत. “माझी आजी (श्रीमती ईंदिरा भट)वय १०२ वर्षे सावरकर गौरव यात्रेत सहभागी झाली मिरज येथे,” असं कॅप्शन पोंक्षेंनी या फोटोला दिलं आहे.

राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर शरद पोंक्षेंनी प्रतिक्रिया दिली होती. “राहुल गांधी राजकारणात आल्यापासून सावरकरांवर चिखलफेक करत आहेत. एक तर सावरकरांनी आयुष्यात कधीही माफी मागितली नाही, हे सावरकरांवर व्याख्यान देणारे आणि त्यांच्या वंशजांनीही सांगितलं आहे. ‘दयेचा अर्ज’ असं त्याला म्हणतात, हे अनंत वेळा सांगून झालं आहे. पण ही राहुल गांधी आणि त्यांची टीम ही झोपेचं सोंग घेतलेले लोक आहेत,” असं शरद पोंक्षे म्हणाले होते.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sharad ponkshe 102 year old grandmother took part in bjp veer savarkar gaurav yatra kak