मराठी अभिनेता पुष्कर जोग त्याने जातीय सर्वेक्षणासाठी आलेल्या बीएमची कर्मचाऱ्याबद्दल केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आहे. त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत बीएमसीच्या महिला कर्मचाऱ्याने जात विचारल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यावेळी ती कर्मचारी जर महिला नसती तर दोन लाथा मारल्या असत्या असं विधान केलं होतं. त्याच्या या विधानानंतर अभिनेता अभिजीत केळकरने फेसबुक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली. त्या पोस्टवर शरद पोंक्षे यांनी केलेल्या कमेंटने लक्ष वेधून घेतलं आहे.
पुष्कर जोगची पोस्ट काय?
“काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार,” अशी पोस्ट पुष्करने रविवारी केली होती.
अभिजीत केळकर काय म्हणाला?
अभिजीत केळकरचे पालक महानगरपालिकेत कामावर होते. त्यामुळे त्याने त्याचे अनुभव सांगत पुष्करवर नाराजी व्यक्त केली होती.
अभिजीत केळकरची पोस्ट –
शरद पोंक्षे यांची कमेंट नेमकी काय?
माझ्या घरीसुद्धा नगरपालिकावाले आले होते. मी त्यांना चहा-पाणी विचारलं व मी ब्राह्मण आहे, मला कसलीच सवलत नको म्हणून नोंदही नको, असं नम्रपणे सांगितलं. त्यावर हसून ते निघून गेले. दरवाजावर कोणीही आलं तरी त्याचा आदर करणं ही आपली संस्कृती आहे. नकारसुद्धा नम्रपणे देता येतो.
वादानंतर पुष्कर जोगने व्यक्त केली दिलगिरी
पुष्करच्या पोस्टवरून वाद निर्माण झाल्यावर त्याने सोमवारी रात्री पोस्ट करून दिलगिरी व्यक्त केली होती. “मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो,” असं पुष्करने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.