अभिनेते शरद पोंक्षे यांनी नाटक, चित्रपट, मालिका हा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयानं वेगळी छाप उमटवली आहे. मराठी मनोरंजनसृष्टीत परखड विचार मांडणारे अभिनेते, अशी त्यांची ओळख आहे. ते अभिनयाव्यतिरिक्त स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्व याविषयी व्याख्यानं देत असतात. व्याख्यानं फुकट देण्याच्या मागणीवर नुकतंच त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये त्यांनी व्याख्यानं फुकट देण्याच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “वीर सावरकरांचं कार्य करताय, तर व्याख्यानं फुकट दिली पाहिजेत, असं म्हटलं जातं. जर मी फुकट व्याख्यानं देत राहिलो, तर मी मेलो तरी यांना चालणार आहे. आणि मी मेल्यानंतर हे कार्य थांबणार आहे, तेही यांना चालणार आहे. एक-दोन तासांची व्याख्यानं देण्यासाठी २२ हजार पृष्ठांचं साहित्य वाचायला लागतं.”
हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबला चाहत्यांकडून पाहिजेत ‘हे’ गिफ्ट्स; म्हणाली, “मुंबईत एक घर अन्…”
“म्हणजे सात-आठ वर्षं इंजिनियरिंगचा अभ्यास करून, ते इंजिनीयर फुकटात नोकरी करीत नाहीत. सात-आठ वर्षं मेडिकलचा अभ्यास करून, सात-आठ वर्षं वकिलीचा अभ्यास करून डिग्री मिळवून त्याच्यानंतर एकही माणूस फुकट काहीच करीत नाही. अहो, फुकट सोडा दोन-पाच हजारांसाठी आपण नोकऱ्या बदलतो आणि ही माणसं म्हणतात, पोंक्षेंनी हे खरं फुकट केलं पाहिजे. विस्ताराचं विमान काय माझ्या वडिलांनी बांधलंय? एवढं महान कार्य करतोयस तर जा. एवढी २३ वर्ष व्याख्यानं देतोय, पण एक वाणी असा मला भेटलेला नाही; जो म्हणाला की, तुम्ही उत्तम काम करताय, पाच किलो साखर यांच्या घरी जाऊ दे. कोणीही म्हणत नाही,” असं शरद पोंक्षे स्पष्टच म्हणाले.
दरम्यान, शरद पोंक्षे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या ते ‘झी मराठी’वरील ‘दार उघड बये’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या दररोज भेटीस येत आहेत. तसेच लवकरच त्यांचे बहुचर्चित नाटक ‘नथुराम गोडसे बोलतोय’ हे पुन्हा एकदा रंगमंचावर पाहायला मिळणार आहे.