शरद पोंक्षे सध्या त्यांच्या ‘पुरुष’ या नाटकामुळे चर्चेत आहेत. ‘पुरुष’ या नाटकात स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या नाटकाच्या एका पोस्टवर त्यांना मुलीच्या शिक्षणावरून ट्रोल करण्यात आलं होतं. त्यासंदर्भात शरद पोंक्षे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांची मुलं हे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्राकडे वळतात. तर काही कलाकारांची मुलं अपवाद असतात. शरद पोंक्षे यांनी यांची मुलगी सिद्धी वैमानिक होण्याचे शिक्षण घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी परदेशात गेली होती. तिने तिथेच तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि ती वैमानिक झाली. शरद पोंक्षे त्यांच्या व्याख्यानांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यावर “हा बहुजनांच्या पोरांची माथी भडकवतोय आणि स्वतःच्या पोरीला मात्र अमेरिकेत पायलट व्हायला पाठवलं”, अशा कमेंट्स त्यावर असतात. आता मात्र नाटकाच्या पोस्टवरही लोक कमेंट्स करून मुलीच्या शिक्षणाबद्दल बोलत असल्याचं शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – ऐश्वर्या नारकर यांची ऑनस्क्रीन लेक अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला सोहळा, फोटो आले समोर
े
ट्रोलिंगबद्दल शरद पोंक्षे म्हणाले…
एबीपी माझाशी बोलताना शरद पोंक्षे म्हणाले, “पुरुष नाटकाच्या पोस्टवरती काही लोकांच्या अशा प्रतिक्रिया होत्या की ‘तुझी मुलगी मात्र तू अमेरिकेला पाठव शिकायला.’ आता याचा काय संबंध. पोस्ट काय आहे तर पुरुष नाटकाचा फोटो टाकलाय आणि पुढचे प्रयोग कुठे आहेत ते सांगितलंय. त्यावर कमेंट्स येतात, ‘तुझी मुलगी तू अमेरिकेला शिकायला पाठव आणि आम्ही काय तुझे नाटक बघायचं का’. अरे नको येऊस बाबा नाटक बघायला. किंवा तुझी मुलगी पाठव अमेरिकेला. आता काय बोलावं यावर. मी या सगळ्यांकडे दुर्लक्ष करतो.”
शरद पोंक्षे यांनी आधीही ट्रोलिंगला दिलेलं उत्तर
“माझी मुलगी पायलट व्हायला अमेरिकेला गेली. विचारांचा प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी माझ्या व्याख्यानामधले काही रील्स मी सातत्याने सोशल मीडियावर टाकत असतो. त्याखाली कमेंट्स असायच्या. हा बघ, बहुजनांच्या पोरांची माथी भडकवतोय आणि स्वतःच्या पोरीला मात्र अमेरिकेत पायलट व्हायला पाठवलं. आता हे बोलताना त्यांना हे माहीत नाही की गांधीजी, आंबेडकर, सावरकरदेखील परदेशातच शिकायला गेले होते. सगळी माणसं परदेशातच शिकायला गेली होती. परदेशात शिकायला जाणं काही पाप नाही. चांगलं शिक्षण हवं असेल आणि जर ते आपल्याकडे नसेल तर जाईल ना माणूस. त्यात काय प्रॉब्लेम आहे. पोस्ट कुठली आहे, काय लिहिलं आहे, कशावर काय बोलतो आपण, कशाचा काहीच संबंध नसतो. मग ही गाढवं आहेत असा मी विचार करतो आणि मला त्यांच्याबाबतीत वाईट वाटतं,” असं शरद पोंक्षे एका मुलाखतीत म्हणाले होते.