मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते शरद पोंक्षे. अनेक चित्रपट, नाटक आणि मालिका या माध्यमातून त्यांनी कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका साकारणारे शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते त्यांची मतही परखडपणे मांडत असतात. नुकतंच शरद पोंक्षेंनी महात्मा गांधींबद्दल वक्तव्य केले आहे.
अभिनेते शरद पोंक्षे हे देशातील राजकीय घडामोडी, देशाचा इतिहास याबद्दल परखडपणे मत मांडताना दिसतात. नुकतंच त्यांनी अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या गप्पा मस्ती या पॉडकास्टला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधींबद्दल त्यांची मत सांगितली.
आणखी वाचा : शरद पोंक्षेंची मुलगी झाली वैमानिक; म्हणाले, “कोणतीही सवलत,आरक्षण नसताना…”
शरद पोंक्षे काय म्हणाले?
“मी जेव्हा गांधींना गोळी मारण्याचा तो सीन करायचो, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. पण याबद्दलही मी पुस्तकात खंत व्यक्त केली आहे. मतमतांतरं असू शकतात. आपली विचारसरणी वेगळी असू शकते. पण ती माणसं मोठी आहेत. शरद पोंक्षे म्हणून मी सावरकरवादी आहे. पण गांधींना मी कधीही इतर लोक ज्या पद्धतीने सर्वच महापुरुषांबद्दल जे अत्यंत असंस्कृत शब्दात हेटाळणी करतात, मी चुकूनही असं कधीच बोलू शकणार नाही.
मी गांधीजींचं मोठेपण कधीच अमान्य करु शकणार नाही. फक्त त्यांची पराकोटीची अहिंसा ती जरा अतीच झाली आणि मुस्लीम लांगूलचालन याचा परिपाक एवढा झाला की, त्याचे फार भयंकर परिणाम आज आपल्याला भोगावे लागतात.मी गांधीजींना विरोध करताना ही सुसंस्कृत भाषा सोडणार नाही. मी माझी पातळी सोडू शकत नाही. माणसाचं मोठेपण आहे”, असे शरद पोंक्षेंनी म्हटले.
आणखी वाचा : ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला शरद पोंक्षेंचा रामराम, कारण आले समोर, म्हणाले “माझ्या जागी…”
दरम्यान शरद पोंक्षे हे काही दिवसांपूर्वी ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपटात झळकले होते. त्यानंतर ते ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिकेत झळकताना दिसत होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी या मालिकेतून एक्झिट घेतली. आता ते ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात डॉ. हेडगेवार ही भूमिका साकारणार आहेत.