Chhaava Movie : विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरचं सर्वांनीच भरभरून कौतुक केलं आहे. पण, यामधल्या नृत्यावर राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय चित्रपटातले काही संवाद देखील नेटकऱ्यांना खटकले आहेत. अशात आता आणखी एका मराठी अभिनेत्याची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे.

मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजेच अजिंक्य राऊत. अलीकडचे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अजिंक्यने देखील इन्स्टाग्रामवर नुकतंच आस्क मी सेशन घेतलं. यावेळी त्याला नेटकऱ्याने, “विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाबद्दल तुमचं मत काय?” असा प्रश्न विचारला. यावर अजिंक्यने व्हिडीओ शेअर करत सविस्तर उत्तर दिलं आहे.

‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेता काय म्हणाला?

अजिंक्य राऊत म्हणाला, “छावा’चा ट्रेलर खूपच कमाल आहे. त्याचप्रमाणे विकी कौशल सुद्धा उत्कृष्ट अभिनेता आहे. पण, महाराजांची भूमिका करण्यासाठी मराठी अभिनेता असला पाहिजे होता. माझी खरंच इच्छा होती की एखाद्या मराठी अभिनेत्याने ते केलं पाहिजे होतं. पण, आपण कुठेतरी इंडस्ट्री म्हणून कमी पडतोय. लहान तोंडी मोठा घास घेतोय… एक प्रेक्षक म्हणून आणि मराठी सिनेविश्वाचा प्रतिनिधी म्हणून असं वाटतंय की, महाराजांची भूमिका करण्यासाठी मराठी अभिनेता असायला हवा होता किंवा येत्या काळात अशाप्रकारच्या मराठी पार्श्वभूमी असणाऱ्या भूमिका करण्यासाठी असा कोणीतरी अभिनेता यावा जो ती भूमिका साकारू शकेल. उदाहरणार्थ, चंदू चॅम्पियन, मुंज्या असो आणि आता महाराजांची भूमिका असो…या भूमिका मराठी अभिनेत्यांनी केल्या पाहिजे.”

“मला यामागचा व्यावसायिक दृष्टीकोन सुद्धा समजतो पण, अशा मराठी पार्श्वभूमी असलेल्या भूमिका करण्यासाठी मराठी अभिनेता असता तर अजून छान वाटलं असतं.” असं कॅप्शन अजिंक्यने या व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये विकी कौशलसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना, अभिनेता अक्षय खन्ना असे कलाकार झळकणार आहेत. चित्रपटात सुव्रत जोशी, शुभंकर एकबोटी, संतोष जुवेकर असे मराठी कलाकार देखील झळकले आहेत.

Story img Loader