लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मराठीसह हिंदीमधलेही त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत. त्यामध्ये ‘आज की आवाज’, ‘माफीचा साक्षीदार’, ‘हम दोनों’, ‘अब तक छप्पन’, ‘वजूद’, ‘खामोशी’, ‘नटसम्राट’, ‘ओले आले’, अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. अभिनयाबरोबरच नाना पाटेकर त्यांच्या परखड स्वभावासाठी ओळखले जातात. अनेक कलाकार त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना दिसतात. आता प्रसिद्ध अभिनेते श्रीकांत यादव(Shrikant Yadav) यांनी नाना पाटेकरांविषयी वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीकांत यादव यांनी नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक चित्रपटांचे किस्से सांगितले. ‘देऊळ’ या चित्रपटात नाना पाटेकरांबरोबर त्यांनी काम केले आहे. या चित्रपटाची आठवण सांगताना त्यांनी म्हटले, “मी वेगळे नाना पाटेकर अनुभवलेत. मी वेगळ्या नानांबरोबर राहिलो आहे. मी नानांना म्हटलंसुद्धा आहे की, हे सगळ्यांना का दिसत नाही? त्यावर त्यांनी म्हटलेलं की, मी तेवढ्यापुरता तसा असतो. लोकांचा जे घ्यायचं आहे, ते त्या गोष्टी घेतात.”

श्रीकांत यादव पुढे म्हणाले की, माझा वाढदिवस नाना पाटेकर यांनी साजरा केला. मी जेव्हा ३९ वर्षांचा झालो तेव्हा मी थेट त्यांच्या पाया पडायला गेलो. त्यावर त्यांनी म्हटलेलं की, केक वगैरे आज होऊन जाऊ दे. नानांनी दोन केक आणून ठेवले होते. एकावर माझ्या चित्रपटातील भूमिकेचं नाव लिहिलं होतं; तर एकावर माझं खरं नाव लिहिलं होतं. त्यांनी माझा वाढदिवस साजरा का करावा? पण त्यांचं इतकं प्रेम आहे. सगळ्यांना त्यांनी टी-शर्ट दिले होते. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी ते स्वत: जेवण तयार करून, सर्वांना जेवू घालत होते. तसेच ते सर्वांना आग्रहानं जेवायला लावायचे. असा तो वेगळा माणूस दिसतो. वेगळे नाना दिसतात. त्याबरोबरच देऊळ या चित्रपटात काम करताना नाना पाटेकरांकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

श्रीकांत यादव यांनी इलू इलू १९९८, लस्ट स्टोरीज २, जलसा, वळू, देऊळ अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे. मराठीसह त्यांनी हिंदी, तमीळ चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या खलनायकांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांनी अनेक वेब सीरिजमध्येदेखील काम केले आहे. आता आगामी काळात ते कोणत्या भूमिकेतून, तसेच कोणत्या चित्रपटातून किंवा वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.