अभिनेता सिद्धार्थ जाधव(Siddharth Jadhav) हा त्याच्या ‘हुप्पा हुय्या’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘जत्रा’, ‘दे धक्का’, ‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘इरादा पक्का’, ‘खो खो’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘शासन’, ‘रझाकार’, ‘शिकारी’, ‘सर्कस’, अशा अनेक चित्रपटांमुळे ओळखला जातो. याबरोबरच अभिनेता सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ या शोचे सूत्रसंचालनदेखील करताना दिसतो. वेळोवेळी त्याच्या कामाचे कौतुक चाहते तसेच कलाकारांकडून होताना दिसते. आता अभिनेत्याचे एक वक्तव्य लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
ते चित्रपट पाहण्यासाठी…
सिद्धार्थ जाधवने नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या करिअर, सिनेसृष्टीतील प्रवासातील चढ-उतार, पंढरीनाथ कांबळे, महेश मांजरेकर, भरत जाधव यांचे मार्गदर्शन; त्यामुळे त्याच्या करिअरला मिळालेले वळण अशा अनेक बाबींवर संवाद साधला. सिद्धार्थ जाधवने काही जणांना बायोपिक स्टार म्हणून संबोधले आहे. तसा मी सिक्वेल स्टार होणार आहे, असे वक्तव्य केले. अभिनेता म्हणाला, “माझ्या करिअरचा २५ वर्षांचा काळ मला इतका छोटा का वाटत असेल? कारण मी ज्या ज्या सिनेमांचा भाग होतो, त्या सिनेमांचं खूप कौतुक झालं. मी एकदा गमतीने कोणाला तरी म्हणालो, आपल्याकडे कसे बायोपिक स्टार आहेत किंवा चॉकलेट हिरो आहेत, तसा मी आता सिक्वेल स्टार होणार आहे. कारण ‘जत्रा २’, ‘दे धक्का २’, ‘येरे येरे पैसा ३’ येतोय, ‘साडे माडे तीन २’ येतोय. ‘नवरा माझा नवसाचा २’ मध्ये होतो. मी मराठी सिनेमाच्या प्लाझाचं म्हणजे भारत माताचं गेट तुटण्यापासून ‘दे धक्का’चे तिकीट ब्लॅक होण्यापासून ते आठ बाय दहाचे ‘तस्वीर’चे शो काढून ते ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ शो वाढवण्यापर्यंत असा काळ मी सिनेमांचा पाहिला आहे.”
“लोक ते चित्रपट पाहण्यासाठी तुटून पडत होते. त्यावेळेला पाहिलेले सिनेमे, पुन्हा एकदा तोच मनोरंजनाचा भाग आणखी एकदा लोकांसमोर येतो आणि त्या प्रत्येक सिनेमात मी कुठेतरी होतो, तीही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की लोकांनी ती आवडली; त्याचं कौतुक झालं.” पुढे अभिनेत्याने मिश्कीलपणे म्हटले की, तो गोलमालचा सिक्वेल, सूर्यवंशमचा सिक्वेलमध्ये आहे, त्यामुळे सिक्वेल स्टार मी होऊ शकतो, असे सिद्धार्थने हसत म्हटले.
दरम्यान, सिद्धार्थ जाधव लवकरच ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात भरत जाधवदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. मराठीसह हिंदी चित्रपटांत काम करत अभिनयाची छाप उमटवणारा अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवची ओळख आहे.