लोकप्रिय मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या उत्तम अभिनयाबरोबरच विनोदी शैलीमुळे जास्त ओळखला जातो. अभिनेत्याने फक्त मराठीतच नाही तर हिंदी मनोरंजनसृष्टीतही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच सिद्धार्थचा ‘अफलातून’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सध्या तो चांगलाच चर्चेत आला आहे. नुकत्याच एका एण्टरटेन्मेंट मीडियाशी बोलताना सिद्धार्थने विचित्र फॅन मुमेंटचे किस्से सांगितले आहेत.
‘लोकमत फिल्मी’च्या ‘माय फस्ट’ या सेगमेंटमध्ये सिद्धार्थ जाधव सहभागी झाला होता. त्यावेळेस विचित्र फॅनचा आलेला पहिला अनुभव कोणता? असा प्रश्न विचारल्यावर सिद्धार्थ जाधव म्हणाला की, “जेव्हा बेवडे लोक भेटतात, तेव्हा त्याला विचित्र म्हणता येणार नाही; कारण ते खरे फॅन असतात. त्यांना भेटून खूप बरं वाटतं. मला एक गोष्ट फक्त खरं सांगाविशी वाटते की, पूर्वी मला माझ्या दातांमुळे किंवा दातांमधील फटीमुळे कसं तरी व्हायचं. तेव्हा आपण कसे दिसतो असं व्हायचं. पण, आता काही चाहते असे भेटतात आणि म्हणतात माझ्याही दातात फट आहे, मी तुमच्यासारखा आहे. तेव्हा मला आपण किती वाईट दिसतो असं वाटायचं आणि आज कुठल्या तरी मुलाला असं वाटतं की, आपण सिद्धार्थ जाधवसारखे दिसतो; ती एक चांगली भावना आहे. म्हणजे आपण स्वतःवर प्रेम करणं गरजेचं आहे.”
हेही वाचा – Bigg Boss OTT 2: ‘वेड’ फेम जिया शंकरने खासगी आयुष्याबद्दल केला खुलासा, म्हणाली, “एकट्या आईबरोबर…”
“बाकी विचित्र फॅन म्हणजे बेवडे लोकं थेट गळ्यात हात टाकतात आणि म्हणतात, ‘ऐ सेल्फी काढ ना भाई.’ एके दिवशी तर एक माणूस मला बघून एवढा उत्साही झाला होता की, तो स्वतःच्या डोळ्याला फोन लावून सेल्फी काढत होता. तर काही जण उत्साहाच्या भरात म्हणतात की, ‘ओ सिद्धार्थ जाधव तुम्ही आमचे फॅन आहात. तुम्ही आमच्या संपूर्ण कुटुंबाचे फॅन आहात.’ आता नुकताच घडलेला एक किस्सा आहे. मी व्यायाम करायला जीमला जात होतो तेव्हा काही फॅन म्हणाले, ‘आता कॉमेडी करून दाखवा ना.’ त्यावेळी मी प्रशांत दामलेंचा किंवा कोणाचा तरी डायलॉग आहे तो मी त्यांना ऐकवला. डॉक्टर रस्त्यात भेटला की लगेच बोलता का इंजेक्शन द्या, नाही ना? मग तिकीट काढा आणि चित्रपटगृहात जाऊन बघा”, अशाप्रकारचे किस्से सिद्धार्थने सांगितले.
हेही वाचा – अभिनेता प्रियदर्शन जाधवने न्यूज चॅनलमध्ये केलं होतं काम; ज्येष्ठ पत्रकाराच्या ‘त्या’ वाक्यांनंतर सोडलं काम
दरम्यान, सिद्धार्थ जाधवचा ‘अफलातून’नंतर ‘सुस्साट’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भीतीचा गमतीदार खेळ असलेल्या या ‘सुस्साट’ चित्रपटाचे शूटिंग नुकतेच सुरू झाले आहे. या चित्रपटात सिद्धार्थबरोबर प्रथमेश परब, विदुला चौगुले झळकणार आहेत.