सुबोध भावे दिग्दर्शित ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटातील गाणी तितक्यात आवडीनं ऐकली जातात. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला गेल्या वर्षी सात वर्षे पूर्ण झाली होती. याच औचित्य साधून सुबोध भावेनं एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. आणखी एक संगीतमय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं सुबोधनं जाहीर केलं होतं. त्याचं संगीतमय चित्रपटाचा आज मुहूर्त पार पडला.
हेही वाचा – Video: पृथ्वीक प्रतापचा कात्रजच्या नयनतारासह शाहरुख खानच्या ‘चलेया’ गाण्यावर जबरदस्त डान्स; पाहा व्हिडीओ
अभिनेता सुबोध भावेनं या चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. ‘मानापमान’ असं या संगीतमय चित्रपटाचं नाव आहे. सुबोधनं मुहूर्ताचा फोटो शेअर करत लिहीलं आहे की, “कट्यार नंतर पुन्हा एखादी संगीतमय कलाकृती सादर करावी अशी आम्हा सर्व टीमची इच्छा होती. अखेर सर्वांच्या प्रयत्नाला यश येऊन आज आम्ही जिओ स्टुडियो आणि श्री गणेश मार्केटिंग अॅण्ड फिल्म्स निर्मित कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या ‘संगीत मानापमान’ या नाटकावरून प्रेरित असलेल्या, ‘मानापमान’ या आगामी संगीतमय चित्रपटाचा मुहूर्त पुण्यातील एफटीआयआयच्या पवित्र जागेत केला. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम असूदे…. मोरया”
तसेच पुढच्या व्हिडीओत सुबोध म्हणाला की, “नमस्कार मी सुबोध भावे. मी आता माझ्या अत्यंत आवडत्या जागी आहे. जिथून मला नेहमीच ऊर्जा मिळत आली आहे. इथे आल्यानंतर असं वाटतं की, आयुष्यात प्रचंड भारी काम काहीतरी करावं. ही जागा पुण्यातल्या फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन इंस्टीट्यूटचा कॅम्पस आहे. मी ज्या जागी उभा आहे, त्याला शांतराम पॉन्ड असं म्हणतात. मी खरंतर एफटीआयआयचा विद्यार्थी नाही. पण जेव्हा जेव्हा मी एफटीआयआयमध्ये येतो. तेव्हा मला कायम ती प्रेरणा मिळते. आपण काहीतरी आयुष्यात चांगलं काम केलं पाहिजे. कारण ज्या लोकांनी प्रभात स्टुडिओची स्थापना केली. त्यांनी प्रभात स्टुडिओच्या सगळ्या चित्रपटांमध्ये काम केलं असेल, पडद्यावर किंवा पडद्यामागे. त्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि ऊर्जा या जागेत आहेत. आणि इथे आल्यानंतर ती भावना निर्माण होते. त्यामुळे माझा प्रयत्न असतो की, कुठल्याही गोष्टीची सुरुवात या जागेच्या आशीर्वादाने करून व्हावी. ‘कट्यार काळज्यात घुसली’ या चित्रपटाचा मुहूर्त देखील इथेच केला होता आणि याच झाडाखाली केला होता. माझ्या एका वेब सीरिजची सुरुवात देखील इथूनच केली होती.”
हेही वाचा – “चार दिवसांपूर्वी आमच्याकडे खूप वाईट गोष्ट घडली…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सांगितला प्रसंग; म्हणाली…
दरम्यान, या नव्या चित्रपटाची पोस्ट पाहून कलाकार मंडळींसह चाहते सुबोध भावेवर शुभेच्छांचा वर्षावर करत आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, जितेंद्र जोशी, ऋतुजा बागवे, अश्विनी कासार, प्रतिक देशमुख, प्राजक्त देशमुख, निखिल राऊत अशा बऱ्याच कलाकार मंडळींनी सुबोध भावेला या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.