‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य: एक युगपुरुष’, ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची मोहोर उमटवणारा अभिनेता म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून तो ‘फुलराणी’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
सुबोध भावेने नुकतंच एक मुलाखत दिली. यावेळी त्याला ‘फुलराणी’ चित्रपटाची स्क्रिप्ट आणि त्याची सुरुवात याबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्याने “मला अभिनय क्षेत्रात कधीच करिअर करायचे नव्हते”, असा गौप्यस्फोट केला.
आणखी वाचा : “तू सोडून दुसरी फुलराणी…” प्रियदर्शनीचा चित्रपट पाहिल्यानंतर वनिता खरातची प्रतिक्रिया
सुबोध भावे काय म्हणाला?
“मला कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंग करायचं होतं. त्यावेळी अभिनय क्षेत्रात करिअर करायचं असं काहीच ठरलं नव्हतं. मला अभिनय क्षेत्रात कधीच करिअर करायचं नव्हतं. माझं जे स्वप्न कॉलेजमध्ये असताना पूर्ण झालं नाही. पण चित्रपटाच्या निमित्ताने त्या पात्राचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे.
चित्रपटात माझे काम हे त्या मॉडेल्सला घडवण्याचे आहे. त्यामुळे कुठेतरी माझ्या जुन्या स्वप्नाशी मी त्या पात्राचा संबंध जोडत होतो. त्या निमित्ताने मी पुन्हा ११ वी १२ वीचे दिवस मी जगत होतो. मला ते पात्र करताना खरंच मज्जा आली.
त्यावेळी मॉडेलिंग हे माझे अत्यंत लाडकं असं क्षेत्र होतं. त्याच्याशी मी या व्यक्तिरेखेच्या निमित्ताने जोडला जात होतो. मी या निमित्ताने माझे स्वप्न पुन्हा जगत होतो. जेव्हा या सर्व जणी रॅम्पवॉक करत होत्या तेव्हा मी स्वत:ला त्या जागी पाहत होतो”, असे सुबोध भावे यावेळी म्हणाला.
आणखी वाचा : “मी प्रियदर्शनीला ओळखत नव्हतो, ती हास्यजत्रेत…” सुबोध भावेचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
दरम्यान ‘फुलराणी’ या चित्रपटात सुबोध भावे विक्रम ही भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ही प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. तसेच सुशांत शेलार सौरभ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. बुधवारी २२ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित झाला.