‘हर हर महादेव’ अशी गर्जना करत झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरवर अनेकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. मराठीसह इतर भाषिक ट्रेलरवर या अनेकांनी लाखो प्रतिक्रिया दिल्या आहेत. मराठी आणि हिंदी ट्रेलरला युट्यूबवर अवघ्या काही तासांतच २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ट्विटरवरही हजारो ट्विट्समुळे तो प्रथम क्रमाकांवर ट्रेंड असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र अनेकांनी या ट्रेलरवरुन अभिनेता सुबोध भावेला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मात्र नुकतंच त्याने त्याला ही भूमिका कशी मिळाली याबद्दल भाष्य केले.
‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शनाचा सोहळा सोमवारी (१० ऑक्टोबर) पार पडला. यानंतर काही तासांनी हा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. या कार्यक्रमात सुबोध भावेने त्याला या चित्रपटाबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्दल काय वाटते? याबद्दल सांगितले. यावेळी तो म्हणाला, “हे स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा असं आपण नेहमी ऐकतो, वाचतो. त्याप्रमाणेच मी ही भूमिका साकारावी, ही माझी किंवा दिग्दर्शकाची नाही तर प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती असं माझं मत आहे.”
आणखी वाचा : “…पण शिवाजी पुन्हा होणे नाही” बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटाला तगडी टक्कर देणारा ‘हर हर महादेव’चा ट्रेलर प्रदर्शित
“मी २२ वर्षांपूर्वी जेव्हा मुंबईत आलो, स्ट्रगल करत होतो त्यावेळी एका मालिकेसाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. त्यावेळी माझी निवड झाली नाही. महाराजांची ही भूमिका करण्यासाठी मला तब्बल २२ वर्षे वाट बघावी लागली. कदाचित महाराजांचीच ही इच्छा असेल की, मी माणूस म्हणून अजून प्रगल्भ व्हावं, अभिनेता म्हणून या भूमिकेसाठी अधिक तयार व्हावं, म्हणूनच एवढ्या कालावधीनंतर ही भूमिका माझ्याकडे आली. या भूमिकेला मी पूर्णपणे समर्पणाची भावना दाखवली म्हणूनच ती साकारणं शक्य झालं.” असेही सुबोध म्हणाला.
आणखी वाचा : राज ठाकरेंचा दमदार आवाज असलेल्या ‘हर हर महादेव’मध्ये झळकणार ‘हे’ कलाकार, नावं समोर
दरम्यान हा चित्रपट अभिजित देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तयार झालेला आहे. या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे, हार्दिक जोशी, किशोर कदम, शरद पोंक्षे हे कलाकार झळकणार आहेत. ‘हर हर महादेव’ हा चित्रपट येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधून भारतभरात प्रदर्शित होत आहे. सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग ऍन्ड फिल्म्स आणि झी स्टुडियोज द्वारे या चित्रपटाची निर्मिती केली आहे.