‘दुनियादारी’, ‘क्लासमेट्स’, ‘मॅटर’, ‘खारी बिस्किट’, ‘तुला कळणार नाही’, ‘धर्मवीर’ अशा गाजलेल्या चित्रपटातून आणि मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुशांत शेलार सध्या चर्चेत आला आहे. चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे सुशांतची शरीरयष्टी. नुकताच बहुप्रतीक्षित ‘धर्मवारी २’ चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला. या सोहळ्याला सुशांत शेलारने खास हजेरी लावली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण या व्हिडीओतील सुशांतला पाहून चाहत्यांना धक्काच बसला.
अभिनेता सुशांत शेलारची शरीरयष्टी पाहता चाहत्यांनी अनेक तर्क-विर्तक लावत चिंता व्यक्त केली. सुशांतला गंभीर आहे की काय, असा अनेकांना प्रश्न पडला. पण या चर्चांवर सुशांतने आता स्वतः उत्तर दिलं आहे.
‘सकाळ’ वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सुशांत शेलार म्हणाला, “सगळ्यात आधी मी मायबाप रसिक प्रेक्षकांचं आभार व्यक्त करतो. त्यांनी माझ्याविषयी जी काळजी व्यक्त केली. किंबहूना माझी तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी, असे आशीर्वाद पण दिले; या मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनापासून आभार. सुदैवाने, स्वामींच्या कृपेने मला कुठलाही आजार झालेला नाहीये.”
“समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ नावाचा माझा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय. त्या चित्रपटासाठी माझे आयुर्वेदिक डॉक्टर जयेश जाधव यांच्या सल्ल्यानुसार डाएट करून मी बारीक झालो. मला काही महिन्यांपूर्वी मला फूड इन्फेक्शन वारंवार होत होतं. त्याच्यामुळे अजून माझं वजन घटलं. त्याच्यासाठी मी food intolerance test केली. त्याच्यामध्ये मला ग्लुटन अॅलर्जीचं निदान झालं. गहू, मैदा, भेळ, पाव, बटाटा, मशरूम अशा काही पदार्थांची मला अॅलर्जी झाली. त्याच्यामुळे गेले दोन-तीन महिने वारंवार फूड इन्फेक्शन होत होतं. फूड पॉइंजिंग होत होतं. त्याच्यामुळे माझं वजन अजून घटलं. यामुळे मला थोडासा त्रास झाला. पण आता माझी तब्येत खूप छान आहे. मला कुठलाही भयंकर आजार स्वामींच्या कृपेने झालेला नाही. पण तुम्ही जे माझ्याविषयी प्रेम दाखवलं. त्याच्यासाठी मनापासून आभार. लवकरच जसं समाजात वजन वाढतंय तसंच शारिरीक वजन सुद्धा वाढवेल. धन्यवाद,” असं सुशांत म्हणाला.
सुशांतने वजन घटण्यामागचं नेमकं कारण स्पष्ट केल्यानंतर चाहत्यांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. एका चाहत्याने लिहिलं की, “तू सांगितलंस ते बरं झालं. तो व्हिडीओ पाहून थेट तुझ्या प्रोफोइलवर आलो होतो. देवाची सदैव तुझ्यावर कृपा राहो.”