असंख्य तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला मराठमोळा अभिनेता म्हणून सुयश टिळकला ओळखले जाते. त्याने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटातून अभिनय करत प्रेक्षकांचे स्थान निर्माण केले आहे. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. त्याला त्याच्या स्पष्ट वक्तेपणासाठी कायमच ओळखले जाते. नुकतंच सुयशने मराठी चित्रपट आणि प्रेक्षकांची मानसिकता याबद्दल भाष्य केले आहे. त्याची याबद्दलची पोस्ट व्हायरल होत आहे.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा जितेंद्र जोशी निर्मित ‘गोदावरी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचे अनेकजण कौतुक करताना दिसत आहेत. सुयश टिळकने नुकतंच हा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्याने हा चित्रपट पाहून कसे वाटले याबद्दल सांगितले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याला गोदावरी हा चित्रपट कसा वाटला त्याबद्दल लिहिले आहे.
आणखी वाचा : शिवसेनेचा पदाधिकारी, ८ वर्षांचे रिलेशन आणि घटस्फोट, जाणून घ्या अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल…
सुयश टिळकची इन्स्टाग्राम पोस्ट
“गोदावरी”
साध्या माणसांची साधी सरळ गोष्ट. प्रवाहाबरोबर वाहताना आपण स्वतःला काही वेळा हरवून बसतो, प्रेम देणाऱ्यांना दुरावून बसतो फार उशीर झालाय हे जाणवायच्या आत त्याची जाणीव झाली तर ठीक नाहीतर ही परंपरा चालू राहतेच…प्राजक्त देशमुख अप्रतिम केवळ अप्रतिम लेखन. ए व्ही प्रफुल्लचंद्र अप्रतिम संगीत. निखिल महाजन सहज सुंदर दिग्दर्शन. विक्रम गोखले काकांना शतः प्रणाम त्यांच्या सारखा नट होणे नाही. नीना ताई संजय मोने हे कमाल आहेतच पण विशेष कौतूक जितू चं. ज्यानं मला आयुष्यात लिहायला प्रेरित केलं. वेडं प्रेम दाखवलं, ज्याच्या सहवासात नेहमीच खूप काहीतरी छान कानावर पडतं ज्याच्या कवितेतून आयुष्यात जपून ठेवावं असं काहीतरी मनावर रूजतं. कधी तो मित्र होतो कधी आपल्याहून लहान,अल्लड तर कधी मोठा भाऊ बनून मेन्टॉर होतो. अश्या माझ्या अत्यंत लाडक्या माणसाने केलेला हा सिनेमा. जितेंद्र जोशी I love you तू फार कमाल आहेस आणि कलाकार म्हणून खूप खरा आहेस.
गौरी( गौराक्का) तू किती कमाल काम केलं आहेस. सहज व सुंदर अभिनय. मोहीत टाकळकर दादा आणि प्रियदर्शन जाधव तुम्ही नेहमीच प्रेमात पाडता. Teddy mourya बहुत ही बढीया (एक कान ईधर भी देना चाहीये था! हे वाक्य तर फारंच भिडतं. )
अश्या वेगळ्या धाटणीचे उत्तम सिनेमे घडत रहावेत असं मला मनापासून वाटतं आणि आजूबाजूच्या गजबजाट सुद्धा फक्त स्टार्स किंवा larger than life गोष्टींना प्राधान्य न देता साध्या आशय विषयाला प्राधान्य देणारे व तसे सिनेमे निर्माण करणाऱ्या सर्वांना माझा सादर सलाम.
आता मराठी सिनेमे चालवायचे की नाही हे प्रेक्षकांच्या हातात आहे. अलिकडच्या काळात “कशाला चित्रपटगृहात जायचं OTT वर आलं की बघू” अशी रड फक्त मराठी चित्रपटांबाबतीत जास्त ऐकायला/बघायला मिळते. त्याने मराठी सिनेमे आपल्या महाराष्ट्रातच कमी चालतात. काही सिनेमे अपवाद पण ह्यामुळे अलिकडच्या काळात आलेले अनेक दर्जेदार मराठी सिनेमे दुर्दैवाने चित्रपटगृहात फार काळ टिकले नाहीत,ह्याचं दुःख वाटतं.
महाराष्ट्रातच मराठी सिनेमे नाही चालले किंवा प्रेक्षकांनी ते हट्टानी नाही चालवले तर काय करणार!?! पण अश्या निर्मात्यांमुळे व अश्या चित्रपटांमुळे चांगलं काम करता येईल व बघता येईल अशी आशा वाटत राहते, अशी पोस्ट सुयश टिळकने केली आहे.
दरम्यान गोदावरी हा चित्रपट गेल्या ११ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. निखिल महाजन यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा ए.व्ही.प्रफुल्लचंद्रा यांच्या खांद्यावर आहे. अभिनेता जितेंद्र जोशीने हा चित्रपट दिग्दर्शक निशिकांत कामत यांना समर्पित केला आहे.