अगदी लहान वयातच श्रीकृष्ण आणि रामायण या मालिकेत कुश या भूमिकेतून स्वप्नील जोशी(Swapnil Joshi)ने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. ‘दुनियादारी’, ‘आम्ही सातपुते’, ‘मितवा’, ‘फ्रेंड्स’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘नाच गं घुमा’, ‘तू ही रे’ अशा अनेक चित्रपटांत स्वप्नील वेगवेगळ्या भूमिकांत दिसला. काही दिवसांपूर्वीच त्याचा चिकी चिकी बुबूम बुम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तो सुशीला-सुजीत या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आता या सगळ्यात एका मुलाखतीत त्याने ओसीडीवर केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

त्याला माझ्या लहानपणी…

स्वप्नील जोशीने नुकतीच आरपार या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारले की तुला ओसीडी आहे का? यावर अभिनेता म्हणाला, “हो. खूप आहे. मला असं वाटतं की आता आपण ज्याला ओसीडी म्हणतो, त्याला माझ्या लहानपणी शिस्त म्हणायचे. आपण आता ती पाळत नाही, म्हणून आपण इतरांना म्हणतो की अरे या लोकांना ओसीडी आहे. अनेकदा वेळेत येणाऱ्या लोकांना चिडवतात की हा येऊन बसतो. तर त्याची चूक नाहीये, तो वेळ पाळणारा आहे. तुम्ही सगळे उशिरा येता, म्हणून तुम्हाला वाटतं की तो लवकर येतो.”

“ओसीडी असणं हे नकारात्मक नाहीये. ही आनंदाची गोष्ट आहे. जर तुम्हाला ती नसेल तर ते आत्मसात करायला पाहिजे, कारण ओसीडी हा कोणत्या वस्तूंशी निगडीत नाही, ते तुमच्या जीवनशैलीशी निगडीत आहे; ज्याला नीटनेटकेपणाची सवय आहे, तो त्याच्या कामातही आणतो. तो त्याच्या फोनच्या कॉन्टॅक्ट बुकमध्येही आणतो. त्याच्या डायनिंग टेबलचंही तसंच असणार. तो जी पुस्तकं वाचणार आहे, तीदेखील तशीच रचली असणार. ही तुमची जीवनशैली आहे. हे चांगलं किंवा वाईट असं काही नाहीये.”

तुझ्यावर कधी बंधनं घातली गेली आहेत का? यावर बोलताना स्वप्नील जोशी म्हणाला, “कधीच नाही. मला नाहीत, त्यामुळे माझ्या पत्नी लीनालादेखील नाहीत. मायरा, राघवलादेखील नाहीत. शिस्त आहे, बंधनं नाहीत. उदाहरणार्थ, माझ्याकडे अजूनही घराची किल्ली नाही. पहिल्या दिवसापासून अशी संकल्पना होती की रात्री आलं की बेल वाजवायची. यामागे तीन गोष्टी होत्या. एक अशी की, घरच्यांना कळेल की मी घरी आलो आहे. दुसरी गोष्ट अशी की रात्री तीन-चार वाजता आपण आपल्या आई-वडिलांना उठवतोय या अपराधी भावनेने जर गरज नसेल तर एवढा बाहेर थांबणार नाहीस, वेळच्या वेळी घरी येईल. तिसरी गोष्ट अशी की, रात्री भेट होईल, गप्पा होतील, त्यामुळे दिवसभराचा शीण निघून जाईल. सकाळी जगाला तोंड देण्यासाठी मी पुन्हा एकदा तयार असेन, हा विचार त्यामागे होता.”

दरम्यान, आजच्या काळात संवाद कमी होत चालल्याचेदेखील अभिनेत्याने म्हटले. स्वप्नील जोशी लवकरच सुशीला सुजीत या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीबरोबर तो प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. प्रसाद ओकने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता स्वप्नीलची ही नवी भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.