अभिनेता स्वप्नील जोशी(Swapnil Joshi) लवकरच ‘सुशीला सुजीत’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनाली कुलकर्णीबरोबर तो प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. स्वप्नील जोशी या चित्रपटाचा निर्मातादेखील आहे. स्वप्नील जोशीबरोबर प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हेदेखील चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटातील गाणी प्रदर्शित झाली आहेत, ती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. हा चित्रपट १८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता स्वप्नील जोशीने एका मुलाखतीत केलेले वक्तव्य चर्चेत आहे.
त्याबद्दल आपल्या मनात अपराधीपणा…
स्वप्नील जोशीने आरपार या यूट्यूब चॅनेलला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत स्वप्नील जोशीला विचारण्यात आले की, आई तुझी मार्गदर्शक आहे, तशी मैत्रीणही आहे. आईसाठी मित्राची व्याख्या काय आहे? यावर अभिनेता म्हणाला, “तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना. मी आणि आई एका खोलीत असलो तर सतत भांडतो. पण, मला ती आणि तिला मी असे एकमेकांसाठी असतो. माझा बाऊन्सिंग बोर्ड किंवा माझी पंचिंग बॅग ती आहे. कारण मला माहीत आहे की ती मला जज करत नाही. ती मला आहे तसं स्वीकारते. माझ्यामध्ये ज्या काही कमतरता आहेत, समस्या, गुंतागूंत आहे, या सगळ्यासह ती मला स्वीकारते. मी खूप आज्ञाधारक मुलगा होतो आणि आजही आहे. म्हणजे अजूनही एखादी गोष्ट पटली की मी ती खूप मनापासून फॉलो करतो.”
तू शाळेत पहिल्या बाकावर बसणारा विद्यार्थी होतास का? पहिल्या बाकावर बसणारे खूप ट्रोल होतात. यावर बोलताना स्वप्नील जोशी म्हणाला, “हो, मी पहिल्या बाकावर बसणारा विद्यार्थी होतो. मला वाटतं की यशस्वी लोकं ट्रोल होतात. आपल्याकडे यशस्वी होणं, आपण याला एक नकारात्मक सूर लावतो. आपण यशस्वी असलो की त्याबद्दल आपल्या मनात अपराधीपणा असतो. पैसे कमावण्यालासुद्धा आपण तसंच पाहतो. तुमचं काय बाबा… वगैरे असं लोकांकडून ऐकायला मिळतं. हो कमावलेत पैसे, मेहनत करून कमवलेत. यशस्वी होण्यासाठी हे महत्त्वाचं आणि चांगलं साधन आहे.”
“मी यशस्वी आहे असं आपल्याला कोणाकडून ऐकण्याची सवयच नाहीये. एखादा माणूस यशस्वी आहे, तर आपल्याला मनापासून म्हणता आलं पाहिजे की तू यशस्वी आहेस. मला तुझ्या यशाचा मंत्र सांग, त्यातून मी यशस्वी होण्याचा प्रयत्न करेन. आपण, तू कसा यशस्वी नाही या वादातच वेळ वाया घालवतो.”
पुढे अभिनेता सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत म्हणाला, “ज्याला ट्रॅक्शन आहे, त्याचं ट्रोलिंग होतं. त्यात मुलगा-मुलगी दोन्ही आलं. ट्रोल करण्याची पद्धत वेगळी असेल, पण जर लक्षात आलं, समोरच्याला ट्रोल करून मला काहीच फायदा होत नाही तर समोरच्याचं ट्रोलिंग होणार नाही. ज्या क्षणी समोरच्याला ट्रोल केल्यानंतर त्या कमेंटला ट्रॅक्शन येतं, त्याक्षणी ते ट्रोलिंग वाढतं. त्यामुळे माझ्यासाठी मी ट्रॅक्शनमध्ये आहे की नाही हे जज करण्याचं मीटर आहे.”
याबरोबरच स्वप्नील जोशी याच मुलाखतीत खुलासा करत म्हणाला, “मी माझ्याबद्दल अनेक गॉसिप ऐकली आहेत. इतके लाख रुपये घेतो, त्याशिवाय सिनेमे साइन करीत नाही. अरे हा काय समजतो स्वत:ला, एवढे पैसे घ्यायची याची लायकी आहे का? हल्ली आपल्याकडे दुसऱ्याची लायकी काढायला स्वत:ची लायकी असण्याची गरजच नाही.” पुढे अभिनेता म्हणाला, तो वुमनायझर आहे, भरपूर पैसे घेतो, त्याला खूप अॅटिट्यूड आहे, अशी अनेक गॉसिप ऐकली आहेत.