मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय अशी ओळख असणार अभिनेता स्वप्नील जोशी सध्या ‘नाच गं घुमा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्याची निर्मिती असलेल्या ‘नाच गं घुमा’ पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरू आहे. अशातच अभिनेता स्वप्नील जोशीने नुकतीच आई-वडिलांच्या लग्नाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे; जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
आई-वडिलांच्या फोटोंचा व्हिडीओ शेअर करत स्वप्नील जोशीने लिहिलं आहे, “आई-बाबा लग्नाच्या ५०व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या वयाचा मी होईन तेव्हा तुमच्यासारखा असावा, अशी आशा आहे. तुमचा आशीर्वाद आता आणि नेहमी आहे.
हेही वाचा – चिन्मय मांडलेकरच्या पत्नीला ‘अशी’ जडली मल्याळमची आवड, केसाच्या तेलापासून ते जेवणही बनतं केरळ पद्धतीत
या व्हिडीओच्या सुरुवातीला स्वप्नीलचा एक जुना व्हिडीओ आहे. ज्यामध्ये अभिनेता म्हणतोय, “काही गोष्टी उरल्यात आयुष्यात, ज्या आपल्या हातात राहिल्या नाहीत, आपल्या कुवतीच्या आणि इच्छा शक्तीच्या पलीकडे गेल्या आहेत. याच्यासाठी देवाच्या वरदहस्त पाहिजे. माझ्यासाठी मी आणि माझी बायको अत्यंत भाग्यवान आहोत, आमच्या डोक्यावर २४ तास आई-वडिलांचा हात आहे. त्यांचं सानिध्य आम्हाला लाभलं आहे.” स्वप्नीलच्या या व्हिडीओनंतर त्याच्या आई-वडिलांचे जुने आणि मुलांबरोबरचे फोटो पाहायला मिळत आहेत. शेवटी त्याने आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा – ऑनलाइन ओळख, कच्चे तळलेले बोंबील ते लग्नाची मागणी; चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने सांगितली प्रेमकहाणी
स्वप्नीलच्या या खास पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्याच्या आई-वडिलांना चाहत्यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, स्वप्नीलच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो बऱ्याच चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे. ‘नवरा माझा नवसाचा २’ या बहुचर्चित चित्रपटात तो झळकणार आहे. तसंच स्वप्नील प्रसाद ओक, अभिनेत्री शिवानी सुर्वे, पर्ण पेठे यांच्यासह ‘जिलबी’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ‘बाई गं’ चित्रपटातही स्वप्नील पाहायला मिळणार असून येत्या १४ जून २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पांडूरंग जाधव यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘बाई गं’ चित्रपटात स्वप्नीलसह कोणती अभिनेत्री प्रमुख भूमिकेत झळकणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
© IE Online Media Services (P) Ltd