मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे स्वप्नील जोशी. स्वप्नीलने आजवर अनेक रोमँटिक चित्रपटात काम केलं आहे. त्यामुळे त्याला मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट हिरो म्हणून ओळखलं जात. पण, आता लवकरच स्वप्नील जोशी कधीही न पाहिलेल्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अभिनेता स्वप्नील जोशी आगामी ‘जिलबी’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्या सोबतीला प्रसाद ओक आणि शिवानी सुर्वे पाहायला मिळणार आहे. याच चित्रपटात स्वप्नील विजय करमरकर या डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दमदार मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ १७ जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केलं आहे.
हेही वाचा – Video: अभिषेक बच्चन आला, करीना कपूरची गळाभेट घेतली अन् मग तिने केलं असं काही की…; व्हिडीओ होतोय व्हायरल
‘जिलबी’ चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल स्वप्नील जोशी म्हणाला, “आपला पोलिसी खाक्या दाखवत चोख कामगिरी बजावणारा हा पोलीस अधिकारी आहे. माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला करायला मिळाल्याचा आनंद आहे. विशेष म्हणजे पोलिसांचा अंदाज, त्यांच्या जबरदस्त व्यक्तिमत्वाचा लहेजा हे सगळं करण्यात एक वेगळीच मजा आली.”
पुढे स्वप्नील म्हणाला की, प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा ‘जिलबी’ हा चित्रपट आहे. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचं स्वप्नील सांगतो.
हेही वाचा – “जितकं आपण या अभिनेत्रीला…”, चिन्मय मांडलेकरने निवेदिता सराफांचं भरभरून कौतुक करत केली खंत व्यक्त, म्हणाला…
हेही वाचा – Video: दुआ लिपा लाइव्ह कॉन्सर्टमध्ये शाहरुख खानच्या गाण्यावर का थिरकली? कारण सांगत म्हणाली…
स्वादिष्ट जिलबी वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जात असते.‘जिलबी’ हा चित्रपटसुद्धा वेगवेगळ्या चवींचा आस्वाद आपल्याला देणार आहे. ज्यात विविध व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये आणि सोबत रहस्याचा थरार असं बरंच काही आहे. ‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रुपा पंडित हे चित्रपटाचे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.