दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवा इतिहास रचला. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीमधील कमाईचे सर्व विक्रम मोडले. या चित्रपटामधून आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरु, परश्याची भूमिका साकारणारा आकाश ठोसर आणि परश्याच्या मित्रांच्या भूमिकेतील अरबाज शेठ, तानाजी गालगुंडे हे चौघेही प्रकाशझोतात आले. या चित्रपटात त्याने प्रदीप बनसोडे उर्फ ‘लंगड्या’ हे पात्र साकारलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तानाजी गालगुंडे हा ‘सैराट’ या चित्रपटामुळे चर्चेत आला. नुकतंच त्याने राजश्री मराठी या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला तुझी ‘सैराट’ चित्रपटासाठी निवड कशी झाली? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने घडलेला सर्व किस्सा सांगितला.
आणखी वाचा : “२० मिनिटे वेटींगला थांबले, पण शेवटी…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“मी सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलो असल्याने माझं बालपण हे गावच्या निसर्गाच्या सानिध्यात गेलो. त्यावेळी आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने घरी टीव्ही नव्हता. पण माझी टीव्ही पाहण्याची आवड पाहून घरी टीव्ही आणण्यात आला. त्यानंतर मी रात्री उशीरा लाईट आली तरी टीव्ही बघत बसायचो. मला अभ्यासाची फारशी आवड नव्हती. मी दहावीत नापास झालो होतो. त्यानंतर मी एटीकेटीची परीक्षा देऊन दहावी पास झालो. यानंतर मी १२ वीची परीक्षा कशीबशी दिली. पण कमी गुण असल्याने मला कॉलेज करुन कुठेही नोकरी मिळणार नाही, याची माहिती होती. त्यामुळेच मग मी शेती करण्याचा निर्णय घेतला.

पण माझे काही मित्र मला कॉलेजमध्ये असं होतं, तसं होतं, हे सतत सांगायचे. यामुळे मग मी वर्षभराचा गॅप घेतल्यानंतर पुन्हा एकदा पदवीच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला. मी एक दिवस कॉलेजच्या लायब्ररीत पेपर वाचत बसला होता. त्यावेळी एका मुलाने मला तू बाहेर बस असे सांगितले. त्यावरुन माझं त्या मुलासोबत जोरदार भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की कॉलेजबाहेर येऊन आम्ही मारामारी केली. ही बातमी पूर्ण कॉलेजमध्ये पसरली. यानंतर मग तानाजी कोण याची माहिती संपूर्ण कॉलेजला झाली आणि साठे सरांनाही मी कोण हे माहिती झालो. त्याचवेळी सैराट चित्रपटासाठी ऑडिशन देण्याचे काम सुरू होते. साठे सरांनी मला एकदा अचानक फोन केला. मला तेव्हा वाटलं की काही तरी सुविधा सांगायची असेल, म्हणून त्यांनी फोन केला.

पण त्यांनी मला फोन करुन ‘सैराट’ नावाचा एक चित्रपट येतोय. त्यासाठी तुला ऑडिशन द्यायची, असे सांगितलं. त्यावेळी मी पहिल्यांदा ऑडिशन हा शब्द ऐकला. यानंतर मग मी एका मित्राच्या मोबाईलवरुन दोन-चार फोटो आणि व्हिडीओ साठे सरांना पाठवले. मला फँड्री चित्रपटामुळे नागराज मंजुळे कोण हे माहिती होते. यानंतर मी पुण्याला गेलो. तिथे मला ऑडिशन द्यायला जमत नव्हते. मी कशीबशी ऑडिशन दिली, यानंतर लूक टेस्ट झाली, पण पुढे १५ दिवस त्यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया मिळाली नाही. यादरम्यान मला स्वतचा खूप राग आला होता. पण नंतर मग काही दिवसांनी त्यांचा फोन आला आणि अखेर माझी चित्रपटासाठी निवड झाली. शूटींगही सुरु झाले”, असे तानाजी गालगुंडे यांनी सांगितले.

आणखी वाचा : निर्मिती सावंतची धमाल, रिंकू राजगुरुचा नवा अंदाज अन्…; ‘झिम्मा २’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

दरम्यान तानाजी हा ‘सैराट’ या चित्रपटानंतर अनेक चित्रपटात झळकला. यानंतर त्याने ‘गस्त’, ‘झुंड’, ‘माझा अगडबम’, ‘फ्री हिट दणका’, ‘एकदम कडक’ या चित्रपटात काम केले. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor tanaji galgunde talk about how he select for sairat movie know the details nrp