मुंबईत घर घेणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. सर्वसामान्य माणसांपासून ते कलाकारापर्यंत अनेकजण मुंबईत घर घेण्यासाठी कष्ट करत असतात. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय उमेश कामत आणि प्रिया बापट या जोडीने काही वर्षांपूर्वी मुंबईत घर घेतलं. नुकतंच अभिनेता उमेश कामतने हे घर घेण्यामागे काय कारण होतं, याबद्दल सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी आजही लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. त्यांना ‘Made for each other’ आणि ‘Couple Goal’ असे म्हणतात. उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकतंच प्रिया बापट आणि उमेश कामत या दोघांनी नुकतंच ‘महाराष्ट्र टाइम्स’ला मुलाखत दिली. यावेळी त्याला “तू घर घेताना खूप संघर्ष केलास, त्याविषयी काय सांगशील?” असा प्रश्न विचारण्यात आला होता.
आणखी वाचा : “बोल्ड सीन करण्यापूर्वी नवऱ्याशी चर्चा करतेस का?” प्रिया बापट म्हणाली, “उमेशपेक्षा…”

त्यावर तो म्हणाला, “माझी आई रिझर्व्ह बँकेत नोकरी करायची. त्यामुळे आम्ही सरकारी वसाहतीत राहायचो. साधारण २० वर्ष आम्ही तिथे राहिलो. तिथून बाहेर पडावं असं आम्हाला सगळयांनाच वाटायचं. आम्ही तीन भाऊ होतो. मुंबईत घर घेण्यापेक्षा तो पैसा आपल्या मुलांचं शिक्षण आणि इतर गोष्टींसाठी वापरु, असा विचार आई-बाबांनी त्यावेळी केला. त्यामुळे त्यांनी घर घेण्याची जोखीम पत्करली नाही.”

“पण मला मात्र मुंबईत घर असावं, असं कायमच वाटत होतं. त्यानंतर २००३ मध्ये पैसे जमवायला सुरुवात केली. त्यादरम्यान जागांचे भाव पटापट वाढत होते. मी अनेकदा घर बघायचो, त्यावेळी ते मला परवडत नव्हते. त्यामुळे मी मागे फिरायचो. त्यानंतर पुढची अनेक वर्ष मला घर घेता आलं नाही”, असेही त्याने सांगितले.

आणखी वाचा : “तुम्ही लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला का?” उर्मिला मातोंडकर म्हणाल्या “माझ्या नवऱ्याने…”

“यानंतर आम्हाला सरकारी घर सोडावं लागलं. मग आम्ही माझा जन्म झाला तिथे नेहरु नगरला पुन्हा राहायला गेलो. २०११ साली माझं आणि प्रियाचं लग्न झालं. त्यानंतर आम्ही घर घेतलं. घर घेतल्यावर आमचा बँक बॅलन्स शून्य झाला होता. यानंतर मात्र आर्थिक घडी पुन्हा व्यवस्थित बसवण्यासाठी आम्ही पुन्हा जोमाने काम करु लागलो. पण स्व:कष्टातून मुंबईत स्वत:चं घर घेतल्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही”, असे उमेश कामतने म्हटले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor umesh kamat priya bapat talk about how he buy house in mumbai nrp