मराठी अभिनेते वैभव मांगले त्यांच्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ते अनेकदा राजकीय विषयांवर अप्रत्यक्ष पोस्ट करत असतात. अशाच काही निवडक पोस्टबद्दल त्यांना सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांनी मुलाखतीत प्रश्न विचारले. त्यावर वैभव मांगले यांनी स्पष्ट उत्तरं दिली. यावेळी त्यांनी राजकीय पक्षांच्या विचारधारेबद्दल त्यांचं मत मांडलं.
अक्षय कुमारवर थुंकणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस, राष्ट्रीय हिंदू परिषदेची घोषणा; नेमकं प्रकरण काय?
‘राजकारणात सगळं क्षम्य आहे हे मान्य आहे का? राजकीय पक्षाला विचारधारा असावी का? दोन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तर मतदान कुणाला करावं?’ या पोस्टचा उल्लेख करताच वैभव मांगले हसू लागले. या पोस्टबद्दल ते म्हणाले, “एका बाजुला काही पक्ष म्हणतात आमच्या या विचारधारा आहेत, आम्ही या या प्रणालीने चालतो, आमची ही सगळी रुपरेषा आहे. आम्ही असंच करत आलो आहोत. या रुपरेषेमध्ये, या नियमावलीमध्ये किंवा आमच्या विचारधारेमध्ये हे लोक बसत नाहीत म्हणून आम्ही त्यांना बाद ठरवलं आहे, त्यामुळे तुम्हीही त्यांना बाद ठरवा असं म्हणायचं आणि परत तेच लोक फोडून आपल्या पक्षात सामील करून घ्यायचे. मग ती विचारधारा गेली कुठे?” असा प्रश्न त्यांनी विचारला.
पक्षांच्या फोडाफोडीच्या राजकारणानंतर त्यांनी राजकीय विषयांवर किती बोलावं, हाच मोठा प्रश्न असल्याचं वक्तव्य केलं. “राजकीय पक्षांवर किती बोलायचं, हाच प्रश्न आहे. मी तर राजकीय विषयांवर न बोलायचं ठरवलं आहे. कारण आज काहीतरी बोललो की त्याचं उद्या भलतंच काहीतरी समोर येतं. यामुळे विचारधारा असावी की नसावी, युद्ध आणि राजकारणात सगळं क्षम्य असतं, या सर्व गोष्टींबद्दल नेमकं काय बोलावं. खरं तर सगळा संभ्रमच निर्माण झाला आहे,” असं वैभव मांगले म्हणाले.