अभिनेते वैभव मांगले हे मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार म्हणून ओळखले जातात. मालिका, नाटक, चित्रपट या सगळ्या माध्यमांमध्ये वैभव मांगले यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. उत्तम अभिनयाबरोबर वैभव मांगले त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. नुकतीच त्यांनी सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.
हेही वाचा- “…मग ती विचारधारा गेली कुठे?” वैभव मांगलेंचा राजकीय पक्षांना सवाल; म्हणाले, “दुसऱ्या पक्षाचे लोक…”
वैभव मांगले मूळचे कोकणातले पण नोकरीच्या निमित्त ते मुंबईत आले. कोकणातल्या मुलांच्या परिस्थितीबाबत बोलताना मांगले म्हणाले, “मी बीएससी डिएड केलं आहे. जर मला शिक्षकाची नोकरी लागली असती तर मी मुंबईत कधीच आलो नसतो. मग अशी एक घटना घडते जिथे तुम्हाला प्रश्न पडतो आता काय करायचं आयुष्यात. कोकणात बहुतेक लोकांची आणि मुलांची हीच अवस्था आहे. त्यांना पुढे काय करायच हा प्रश्न पडतो. पण माणसं जगत राहतात.”
मांगले पुढे म्हणाले. “माझ्या वडिलांचे आतेभाऊ विलास कोलपे एकदा मला भेटले. ते म्हणाले, तू मुंबईत जा तुझ्यात चांगल टॅलेन्ट आहे. पण मी हे धाडस यासाठी करु शकलो कारण मी तिकडे पूर्ण निस्तनाभूत होण्याच्या मार्गावर होतो. मी मुंबईत आलो तेव्हा मी २७ वर्षाचा होतो. २१व्या वर्षी माझं ग्रॅज्यूएशन झालं त्यानंतर ४ वर्षे मी काहीच केलं नाही. एका कोकण कॅपस्युल कंपनीत मी सात आठ महिने कामाला होतो. त्यानंतर रत्नागिरीत सम्राट पाईप नावाच्या कंपनीत काम केलं. याच्या पलीकडे काहीच काम नव्हतं.”