मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये जात नाहीत असा नाराजी सूर बऱ्याचदा ऐकायला मिळतो. शिवाय मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक जात नसल्यामुळे चित्रपटाचे शो रद्द झाले असल्याचंही बऱ्याच घटना घडल्या आहेत. याबाबत अनेक कलाकार मंडळींनी तसेच कलाक्षेत्रातील मंडळी व्यक्त होताना दिसतात. आता अभिनेता वैभव मांगलेंनी मराठी चित्रपटांबाबत आपलं रोखठोक मत मांडलं आहे.
वैभव यांचा ‘धोंडी चंप्या – एक प्रेम कथा’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. याचनिमित्त ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मराठी चित्रपटांना मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत भाष्य केलं. वैभव म्हणाले, “मराठी चित्रपटांची गळचेपी होते याच्या मी थोडा विरोधात आहे. जेव्हा ‘सैराट’ चित्रपट तसेच मधल्या काळामध्ये एक-दोन मराठी चित्रपट चालले तेव्हा हिंदी चित्रपटांच्या स्क्रिन कमी करण्यात आल्या. चित्रपटांच्या ५० तिकिटांची विक्री झाली आहे आणि कोणी ती तिकिटं परत करत असतील तर हा गुन्हा आहे. असं काही घडत असेल तर हा अन्याय आहे असं माझं मत आहे.”
“पण मुळात तीनच तिकिटं विकली गेली असतील आणि चित्रपटगृहाचा मालक म्हणाला आम्हाला या तीन तिकिटांसाठी चित्रपटाचा शो करता येणार नाही. मग मला सांगा यामध्ये कोण कोणावर किती अन्याय करत आहे. चित्रपटगृहाच्या मालकाला काही धंदा नको आहे का? त्यालाही धंदा हवा आहे. चालत असलेला चित्रपट जर तुम्ही काढत असला तर ते अन्यायकारक आहे. याच्याबाबत आंदोलन झालं पाहिजे आणि यावर कारवाई झाली पाहिजे.”
आणखी वाचा – Video : दीपिका पदुकोणनंतर सनी लिओनीने परिधान केले भगव्या रंगाचे कपडे, समुद्रकिनारी वाळूत लोळली अन्…
पुढे ते म्हणाले, “आता एकापाठोपाठ बरेच मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. लोकांनी मराठी चित्रपटांकडे पाठच फिरवली. एक अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून आपण विचार केला पाहिजे की, माझा मराठी चित्रपट पाहण्यासाठी लोक का येत नाहीत. यावर सर्वाधिक विचार करण्याची गरज आहे. पण हे बाजूला करुन एक-दोन तिकिटं परत केली म्हणून तुम्ही आंदोलन करणार आहात का?. आम्ही अजून तिथेच अडकलो आहोत. पुढे जायलाच तयार नाही. मराठी चित्रपटांच्या तुलनेत मराठी नाटक पाहा. ४०० ते ५०० रुपये नाटकांच्या तिकिटांचं दर आहे. पण आजही नाटकं हाऊसफुल होतात. लोक नाटक पाहायला येतात. कारण आम्ही त्या दर्जाचं काम लोकांना देतो. मराठी चित्रपट पाहायला प्रेक्षक येत नाही असं म्हणतात. अरे पण आम्ही काय बरं करतच नाही तर मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक कसे येतील?” वैभव यांनी अगदी स्पष्ट शब्दांमध्ये मराठी चित्रपटांबाबत आपलं मत मांडलं आहे