मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून वैभव तत्त्ववादीला ओळखले जाते. ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘व्हॉट्स अप लग्न’, ‘भेटली तू पुन्हा’ अशा अनेक चित्रपटातून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. सध्या तो त्याच्या तीन अडकून सीताराम या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच वैभव तत्त्ववादीने विनोदी अभिनेते व रंगकर्मी सतीश तारेंबद्दल वक्तव्य केले आहे.
नुकतंच तीन अडकून सीताराम या चित्रपटाच्या निमित्ताने वैभव तत्त्ववादीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला तुझ्या दृष्टीने हास्यविनोदाचा अचूक वेळ साधणारे कलाकार कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने विनोदी अभिनेते व रंगकर्मी सतीश तारे असे नाव घेतले.
आणखी वाचा : “अखेर मला अधिकृतरित्या…” प्रथमेश लघाटेच्या पोस्टने वेधलं लक्ष, फोटो शेअर करत म्हणाला…
“सतीश तारे हे फारच उत्कृष्ट अभिनेते होते. सतीश तारेंसारखा दुसरा नट मी पाहिलाच नाही. मी शाळेत, कॉलेजमध्ये असताना त्यांची अनेक नाटक पाहिली आहेत. त्यांना ‘किंग ऑफ टायमिंग’ असंच म्हणायला हवं. त्यांच्यासारखा माणूस मी कुठेही पाहिला नाही”, असे वैभव तत्त्ववादी म्हणाला.
दरम्यान आपल्या विनोदी अभिनयाने मराठी रसिकजनांचे दिलखुलास मनोरंजन करणारे अस्सल विनोदी अभिनेते व रंगकर्मी म्हणून सतीश तारेंना ओळखले जाते. मराठी सिनेसृष्टीतील अभिनयाचा सम्राट अशीही त्यांची ओळख होती. मराठी रंगभूमी, छोटा पडदा आणि चित्रपटसृष्टी ही सर्वच क्षेत्र त्यांनी गाजवली.
आपल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाने आणि दमदार अभिनयाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. विनोदाचा हुकमी एक्का म्हणून तारे प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध होते. मराठी भाषेवर आधारित तसेच प्रसंगोचित विनोद किंवा कोट्या करण्यात तारे यांचा हातखंडा होता.