‘टूरटूर’, ‘विच्छा माझी पुरी करा’ अशा अनेक नाटकांमधून ऐंशी ते नव्वदच्या दशकात मराठी रंगभूमी गाजवणारे अभिनेते म्हणजे विजय कदम. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारून रसिक प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली. ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘इरसाल कार्टी’, ‘दे दणादण’ अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं. १० ऑक्टोबर २०२४ रोजी विजय कदम यांनी वयाच्या ६७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी पद्मश्री जोशी आणि मुलगा असा परिवार आहे.
काही दिवसांपूर्वी विजय कदम यांच्या पत्नी पद्मश्री जोशी यांनी कांचन अधिकारी यांच्या ‘बातों बातों में’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विजय कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला. पद्मश्री यांनी विजय कदम यांच्याशी पहिली भेट कशी आणि कुठे झाली? याबाबत सांगितलं.
पद्मश्री जोशी म्हणाल्या, “आमच्या दोघांची एकाच वेळी दोन नाटकं सुरू होती. त्याचं ‘रथचक्र’ चालू होतं, माझं ‘अश्वमेध’ चालू होतं. दोन्ही नाटकं मुंबई आणि पुण्याला तुफान चालली होती. त्यामुळे आम्ही एकमेकांना क्रॉस व्हायचो. आमचं पुण्याला झालं की त्याचं मुंबईत असायचं. आम्ही मुंबईत आल्यावर त्याचं पुण्याला नाटक असायचं. बहुतेकदा बालगंधर्वला वरती राहायचो तिथे भेटी व्हायच्या. पण तिथे माझी त्याच्याशी ओळख नव्हती. त्याला फक्त येता-जाताना बघितलं होतं.”
हेही वाचा – Video: शिवानी सोनार लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नात घालणार पणजीची नथ; म्हणाली, “जुने आणि पारंपरिक दागिने…”
पुढे पद्मश्री जोशी म्हणाल्या की, मग त्याच्यानंतर भावना बाईंनी नाटक काढलं. ‘चि.सौ.कां चंपा गोवेकर’ असं नाटकाचं नाव होतं. त्याच्यात विजय होता. त्या नाटकाच्या तालीममध्ये पहिल्यांदा त्याच्याशी ओळख झाली. १९८१ सालची त्याची माझी ओळख आहे. ‘टूरटूर’ नाटक मी १९८४मध्ये केलं. ‘चि.सौ.कां चंपा गोवेकर’चे ७५ प्रयोग केले होते. ‘अश्वमेध’चे ३०० प्रयोग केले. ‘चि.सौ.कां चंपा गोवेकर’ नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम, विजय साळवी, बाळ कर्वे, दया डोंगरे अशी फौज होती. विजय त्यात दोन भूमिका करायचा. नाटकाच्या पहिल्या अंकात टेलरची भूमिका करायचा. दुसऱ्या अंकात वकिलाची भूमिका करायचा. तेव्हा आमची थोडीशी ओळख झाली.”
“‘टूरटूर’ नाटकाच्या वेळी माझी तालीमचं घेतली नाही. पुरुंनी मला ऑडिओ कॅसेट दिली सांगितलं, ही कॅसेट ऐक आणि पाठांतर कर. कारण लक्ष्मीकांत बेर्डे खूप व्यग्र होता. मी त्या नाटकात एकटी मुलगी होती. हे सगळे अॅडिशन करणारे मोकाट सुटले होते. ती कॅसेट होती ती अगदी सुरुवातीच्या प्रयोगाची रेकॉर्डेट होती. अगदी त्याच्यात अॅडिशन काही नव्हती. मी विजयला म्हटलं, लक्ष्या व्यग्र आहे, तर तू तरी माझी तालीम घे. तो मग घरी येऊन आम्ही दोघं डायलॉगचा सराव करायचो. त्यामुळे त्याचं घरी येणं-जाणं सुरू झालं होतं,” असं पद्मश्री जोशींनी सांगितलं.