Lok Sabha Elections Results 2024: लोकसभा निवडणूक २०२४चे निकाल स्पष्ट झाले असून यंदा भाजपाला मोठा धक्का बसला आहे. ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने जोरदार टक्कर दिली आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला यंदा कमी जागांवर यश संपादन करता आलं आहे.
गेल्या दिवसांपासून ५४३ लोकसभा लोकसभा जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू होती. काल, ४ जूनला मतमोजणी पार पडली. भाजपाप्रणीत एनडीएने २९३ जागा जिंकल्या असून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने २३२ जागांवर विजय मिळवला आहे. याच निकालावरून सध्या मराठी कलाकार “लोकशाहीचा विजय” झाला असं म्हणताना दिसत आहेत.
हेही वाचा – “भारताने द्वेष, भ्रष्टाचार…”, टायटॅनिकचं उदाहरण देऊन स्वरा भास्करने भाजपाला लगावला टोला, म्हणाली…
प्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धनने सोशल मीडियावर चपखल भाष्य केलं आहे. ज्याला अनेक मराठी कलाकारांनी योग्य असल्याचं म्हटलं आहे. “आजच्या ठळक भावना” असं कॅप्शन देतं क्षितिजनं लिहिलं आहे, “आज कुणीही जिंकलं असलं तरी विजय लोकशाहीचा झाला.”
क्षितिजची ही पोस्ट अभिनेत्री तेजस्विनी पंडितने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे.
तसंच प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक हिनं निकाल लागल्यानंतर इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. ज्यामध्ये तिनं मार्मिकपणे लिहिलं होतं, “आज आपण काय शिकलो? Berger paint धुळीला भिंतीवर टिकू देत नाही.”
अभिनेत्री केतकी चितळेने देखील “आज लोकशाहीचा विजय झाला “म्हणतं इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली होती. तिनं लिहिलं होतं, “आज लोकशाहीचा विजय झाला. कुठलाही राजकीय पक्ष नाही पण लोकशाही जिंकली.” तसंच अभिनेता आशुतोष गोखलेनेही “लोकशाहीचा विजय” असं लिहित इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती.
याशिवाय भाजपाचे आशिष शेलार यांना टोला लगावणारी पोस्ट ‘टाइमपास’ फेम जयेश चव्हाणने इन्स्टाग्राम स्टोरीवर केली होती. त्याने आशिष शेलारांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओत आशिष शेलार म्हणाले होते, “उद्धव ठाकरेजी हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल. मर्द आणि मर्दाचं नेतृत्व करत असाल. तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे. भारतीय जनता पार्टी देशात ४५ च्या वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रतिआवाहन देतो की… देशात जाऊ दे, गेल्यावेळी तुम्ही महाराष्ट्रात आमच्यामुळे १८ जागांवर निवडून आले होतात. आता महाविकास आघाडी मिळून जरी तुम्ही १८ जागांवर निवडून आलात तर मी राजकारण सोडेन.” आशिष शेलारांचा हा व्हिडीओ शेअर करत जयेशने लिहिलं की, आशिष शेलारजी राजकारण सोडण्याचा तयारीत…
हेही वाचा – “माझी प्रिय कंगना…”, बॉलीवूडची ‘क्वीन’ मंडीतून विजयी झाल्यावर अनुपम खेर यांची खास पोस्ट, म्हणाले…
दिग्दर्शक आशिष बेंडेने देखील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चपखल भाष्य केलं आहे. “खरं तर ते जिंकलेत, हे हरलेत पण…हे खुश आहेत आणि ते नाराज”, असं त्यानं लिहिलं आहे.
दरम्यान, लोकसभा २०२४च्या निवडणुकीच्या निकालावरून सध्या भाजपावर टोलेबाजी सुरू आहे. यंदाचा लोकसभा निवडणूक निकाल एका अर्थाने भाजपाच्या डोळ्यांत अंजन घालणारा ठरला, असं म्हटलं जात आहे.