बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातलं राजकारण तापलं आहे. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. पण, या प्रकरणामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. संतोष देशमुख हत्येबाबत बोलत असताना भाजपा आमदार सुरेश धस मंत्री धनंजय मुंडेंवर टीका करत होते. याचवेळी त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांची नावं घेतली. ज्यामुळे सध्या उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे. तसंच सुरेश धसांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंडं फुटलं आहे. याच पार्श्वभूमीवर प्राजक्ता माळीने २८ डिसेंबरला मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि सुरेश धस यांनी जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी केली.
सुरेश धसांच्या विधानाविरोधात प्राजक्ता माळीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या विधानामुळे तिला आणि तिच्या कुटुंबियांना मनस्ताप झाला. यासंदर्भात तिने महिला आयोगाकडे तक्रार केली असून लवकरच ती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी करणार आहे. याच प्रकरणामुळे आता मराठी कलाकार प्राजक्ताला पाठिंबा देण्यासाठी एकवटले आहेत. सोशल मीडियाद्वारे जाहीर निषेध करत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लोकप्रिय निर्माते नितीन वैद्य, पृथ्वीक प्रताप, गौतमी पाटील, कुशल बद्रिके, मुग्धा गोडबोले, विशाखा राऊत अशा अनेक कलाकारांनी प्राजक्ताला पाठिंबा दर्शवला आहे. नुकतंच यासंदर्भात किरण मानेंनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेते आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी किरण माने यांनी लिहिलं की, प्राजक्ताबाबतचे विधान निंदनियचं आहे…त्याचा निषेध. पण सोनियाजींचे बिकीनीवरचे फोटो व्हायरल झाले होते…कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणाविषयी दाद मागत होत्या…मणिपूरला भगिनींची विटंबना झाली…तेव्हा जे महाभाग मूग गिळून वगैरे गप्प बसले, त्यांना अचानक भयानक ‘समस्त महिला वर्गाविषयी’ पुळका वगैरे यावा हे फार विनोदी वगैरे आहे…#सुमारांचा_थयथयाट
दरम्यान, याआधी करुणा मुंडे यांनी प्राजक्ता माळीविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. यावरही प्राजक्ताने २८ डिसेंबरच्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं. प्राजक्ता म्हणाली की, तुम्ही महिला आहात. तुम्ही महिलांना होणारा त्रास समजू शकता. त्यामुळे इथून पुढे तुम्ही कोणत्याही गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय वक्तव्य करणार नाहीत, अशी खात्री बाळगते.