चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना वजनावरून नेहमी ट्रोल करण्यात येत. वजनामुळे त्यांना अनेकदा भूमिकाही मिळत नाहीत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे आरती सोलंकी. विविध विनोदी भूमिकांसाठी आरती सोलंकीला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या माध्यातून तिने मनोरंजनसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, अनेकदा तिला वाढलेल्या वजनावरुन टोमणेही खावे लागले आहेत. अखेर आरतीने वजन कमी करण्याचा निश्चय केला आणि आरतीने आत्तापर्यंत ५० किलो वजन कमी केलं आहे.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत आरतीने आपल्या वजन कमी करण्याचा प्रवास सांगितला आहे, आरती म्हणाली, “२०२१ पासून माझा वजन कमी करण्याचा प्रवास सुरु झाला. तेव्हा माझं वजन १३२ किलो होते. डायेटेशिअन आणि व्यायामाच्या मदतीने मी माझं वजन ११९ किलोंवर आणलं. पण काही कारणामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये खंड पडला. आता पुन्हा एप्रिलपासून मी माझं वजन कमी करायला सुरुवात केली आहे. त्यावेळी माझं वजन ११० किलो होते. मी दिवसातले सात ते आठ तास चालते. जवळपास ४० हजार पावले होतात. सकाळी नाश्ता आणि दुपारी जेवणात एक भाकरी किंवा पोळी-भाजी एवढचं खाते. त्यानंतर दिवसभर काही खात नाही.”
आरती पुढे म्हणाली, “जर भूक लागली तर सॅण्डविच किंवा भेळ खाते. झोपताना दूध पिते. आता माझ वजन ८४ किलो आहे. मला माझं वजन ७० पर्यंत न्यायचं आहे. वजन कमी केल्यापासून माझ्यात खूप सकारात्मक्ता आली आहे. माझ्या वाडीतील माणसं माझं कौतुक करतात. अगोदरचे आणि आत्ताचे फोटो बघून मला फरक जाणवत आहे. माझी पर्सनॅलिटी मला बदलायची आहे. कारण आधीच्या वजनामुळे मी खूप ऐकूनही घेतलं आहे. खूप नकार पचवलेत. पण मला स्वत:ला पूर्णपणे बदलायचं आहे. आठ-आठ तास चालल्याने माझे पाय खूप दुखतात. अनेकदा मी रडतरडत झोपते. पण तरीही मी करतीयं. कारण आज रडेन उद्या रडेन पण कधीतरी स्वत:ला बघून हसेन”
आरतीच्या कामाबद्दल बोलायच झालं तर मालिका, चित्रपट नाटकांमधून तिने आपल्या अभिनाची छाप सोडली आहे. नुकतीच ती ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत दिसली होती. तेव्हा तिच्यात झालेला बदल स्पष्टपणे दिसत होता.