रुपेरी पडदा गाजवल्यानंतर छोट्या पडद्यावर सध्या काम करत असलेल्या लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ऐश्वर्या नारकर ९०च्या दशकात जितक्या लोकप्रिय होत्या, तितक्याच त्या आजही आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाबरोबर सौंदर्यानं प्रेक्षकांच्या मनात एक अटळ स्थान निर्माण केलं आहे. ऐश्वर्या यांनी जरी पन्नाशी ओलांडली असली तरी त्यांचं तारुण्य तरुण मंडळींना लाजवेल असं आहे.
मात्र, गेल्या दिवसांपूर्वी ऐश्वर्या नारकर आणि त्यांचे पती, अभिनेते अविनाश नारकर सतत ट्रोल होताना दिसत आहेत. दोघांचे डान्स व्हिडीओ नेटकऱ्यांना खटकत आहेत. त्यामुळे त्यांना ट्रोल केलं जात आहे. पण या ट्रोलर्सना ऐश्वर्या नारकर सडेतोड उत्तर देताना पाहायला मिळत आहेत. नुकतच त्यांनी एका कार्यक्रमातून पुन्हा एकदा ट्रोलर्सना उत्तर देत सल्लाही दिला आहे.
हेही वाचा – “एक बाईने अथांगला अचानक मागून…”, उर्मिला निंबाळकरने सांगितला लेकाबरोबर घडलेला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
या कार्यक्रमात ऐश्वर्या नारकरांना विचारलं गेलं की, इतकं आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. आम्ही तुम्हाला आमच्या घरामध्येच स्थान देतो. पण अशा काही गोष्टी होतात, ज्यामुळे तुम्ही ट्रोल होता. तुमचं यावर काय मत आहे? या प्रश्नाचं उत्तर देत ऐश्वर्या म्हणतात, “आमचं चुकलं आणि आम्हाला सांगितल्यावर मला वाटतं असा स्फोट होऊ नये आणि होत ही नसावा. सांगण्याची पद्धत काय आहे? याच्यावर अवलंबून आहे. एकतर व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण ते व्यक्ती स्वातंत्र्य दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणार असेल. तर ते व्यक्ती स्वातंत्र्य आपण थोडं आटोक्यात ठेवलं पाहिजे.”
“तुम्हाला मालिका आवडली नाही तर स्वतःचा टीव्ही बंद करा. जर सोशल मीडियावर एखाद्याला तुम्ही फॉलो करताय, त्याच्या पोस्ट तुम्हाला आवडत नाहीये, तर त्याच्यावर वाईट पद्धतीने व्यक्त होण्याचा तुम्हाला अधिकार नाही. त्यापेक्षा तुम्ही त्यांना अनफॉलो करणं हे सोप्प टूल तुमच्याकडे आहे. याने तुम्ही स्वतःचा त्रासही वाचवू शकता आणि समोरच्याचा अपमान ही वाचवू शकता,” असं ऐश्वर्या नारकर म्हणाल्या.
हेही वाचा – ‘रमा राघव’ मालिकेतील अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा; फोटो अन् व्हिडीओ झाले व्हायरल
दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्या सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेमध्ये त्यांनी अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरेच्या आईची भूमिका साकारली आहे.