‘सुभेदार’ चित्रपटाची सध्या मराठी कलाविश्वात जोरदार चर्चा सुरु आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपट हा श्री शिवराज अष्टक मालिकेचा पाचवा भाग आहे. हा ऐतिहासिक चित्रपट सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. २५ ऑगस्टला प्रदर्शित झाल्यावर चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. यामधील प्रत्येक कलाकाराचं सध्या कौतुक करण्यात येत आहे.
‘सुभेदार’ चित्रपटातील मुख्य कलाकारांशिवाय काही ज्येष्ठ कलाकारांनी यामध्ये विशेष भूमिका केल्या आहेत. दिग्गज दिग्दर्शक राजदत्त यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी या चित्रपटात काम केलं आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी ‘सुभेदार’मध्ये छोटी पण अत्यंत प्रभावशाली भूमिका केली आहे. याबाबत अभिनेता चिन्मय मांडलेकरने ‘सुभेदार’ प्रदर्शित होण्यापूर्वी खुलासा केला होता. यामध्ये अभिनेत्री अलका कुबल यांनी कोणती भूमिका साकारली हे जाणून घेऊया…
हेही वाचा : “लय भारी!”, अंशुमन विचारेने बायकोसह रिक्रिएट केलं अशोक सराफ-किशोरी शहाणेंचं गाणं, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
अलका कुबल यांनी सुभेदारमध्ये ‘जना गराडीन’ ही भूमिका साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसह ‘जनाई’चा एक खास सीन ‘सुभेदार’मध्ये चित्रित करण्यात आला आहे. अलका कुबल यांनी साकारलेली ही प्रभावशाली भूमिका शेवटपर्यंत लक्षात राहते.
हेही वाचा : Video: ‘सुभेदार’नंतर अजय पुरकर टाकणार दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल, चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?
चिन्मय मांडलेकर याविषयी सांगताना म्हणाला, “महाराष्ट्राच्या सगळ्यात लाडक्या ताई अर्थात अलका कुबल यांनी ‘सुभेदार’ चित्रपटात छोटी पण अत्यंत सुंदर अशी भूमिका केली आहे. त्यांच्याबरोबर माझे दोन सीन्स आहेत. मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे कारण, माहेरची साडी आम्ही चित्रपटगृहांमध्ये जाऊन अनेकवेळा पाहिला होता. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.” दरम्यान, ‘सुभेदार’ चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांमध्ये तब्बल ५.०६ कोटींची कमाई केली आहे. यामध्ये चिन्मय मांडलकेर, अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.