‘माहेरची साडी’ या चित्रपटाबद्दलच्या आठवणी जरी काढल्या तरी, डोळ्यासमोर पहिलं नाव येतं अलका कुबल. अनेक गाजलेल्या नायिकाप्रधान चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मराठी सिनेसृष्टीत ९० चं दशक गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अलका कुबल ओळखलं जातं.
अलका कुबल यांनी त्यांच्या सहज-सुंदर अभिनयाने प्रेक्षकांचं मन कायमच जिंकून घेतलं. प्रेक्षक त्यांच्याकडे पडद्यावरील आदर्श सून, आदर्श लेक म्हणून पाहायचे. अशा या संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री मराठी सिनेविश्वात प्रचंड चर्चेत राहिल्या पण, त्यांनी हिंदीत फारसं काम केलं नाही. त्यांनी हिंदी सिनेविश्वापासून दूर राहण्याचा निर्णय का घेतला, याचं कारण ‘लोकशाही फ्रेंडली’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
अलका कुबल सांगतात, “आता आपल्या मराठी अभिनेत्रींनी सुद्धा बॉलीवूड गाजवलेलं आहे. माधुरी दीक्षित आहे, सोनाली बेंद्रे आहे कितीतरी मराठी अभिनेत्री आहेत ज्यांनी हिंदी कलाविश्व गाजवलंय आणि आपलं स्वत:चं एक साम्राज्य तयार केलं आहे. या अभिनेत्रींनी त्यांची सुरुवातच हिंदीतून केली होती. पण, मला जेव्हा हिंदी सिनेमाच्या ऑफर आल्या ना…त्या अशा काही मोठ्या फिल्म्सच्या ऑफर नव्हत्या.”
अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “कधी वहिनीची भूमिका मग तिथे चार सीन किंवा दोन सीन…माझं असं झालं की, हिंदीत असं काम करण्यापेक्षा नको…असं काम न केलेलं बरं. त्यात एवढं मोठं काय आहे? मी का जावं? हा सगळा विचार मी केला. मला तशी भूमिका, बॅनर पाहिजे जेणेकरून माझं करिअर होईल. पण, त्याउलट मराठीत मी साम्राज्ञीसारखे होते. ते घालवून मी नको ते का करू? मी माझ्या मराठी प्रेक्षकांच्या मनातून का निघून जाऊ…कारण, नुसतं पैशांसाठी किंवा हिंदीत पर-डे चांगला मिळतोय म्हणून मी तिथे करायचं हे काही बरोबर नाही. त्यापेक्षा मी मराठीत खूश होते.”
“विशेषत: माहेरची साडीनंतर मला अनेक हिंदी चित्रपटांच्या अनेक ऑफर्स आल्या होत्या. पण, मी त्या ऑफर्स स्वीकारल्या नाहीत. अर्थात, धार नावाच्या सिनेमात मी पाहुणी कलाकार म्हणून काम केलं होतं. यात मी एका पत्रकार मुलीच्या भूमिकेत होते. पण, त्यानंतर फक्त हिंदीतच काम करायचं वगैरे मी ठरवलं होतं. कोणीतीही भूमिका निवडताना त्याची लांबी न पाहता मी त्या भूमिकेची चित्रपटात किती गरज आहे हे पाहते आणि विचार करून भूमिका निवडते. पण, हिंदीत ते शक्य झालं नाही. इथे मराठीत मी सातत्याने काम करत होते. माझं नाव होतं त्यामुळे मानधन चांगलं मिळत होतं. त्यामुळे हिंदी काम न केल्याची मला कधीच खंत वाटली नाही.” असं अलका कुबल यांनी सांगितलं.