मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवणाऱ्या मराठी कलाकारांपैकी एक म्हणजे अमृता खानविलकर. अमृताने अभिनयासह नृत्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या सहज-सुंदर अभिनयाचा जितका चाहता वर्ग आहे, त्याच्याहून दुप्पट तिचा नृत्य आणि अदाकारीचा चाहता वर्ग आहे. ‘मुंबई सालसा’ चित्रपटातून पदार्पण करणारी अमृता सध्या मराठी सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या अमृता जपानची सफर करताना दिसत आहे. जपानमधील तिने अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामधील एका पोस्टवर एका नेटकऱ्याने खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ज्यावर अमृताने त्याला चांगलंच सुनावलं.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री अमृता खानविलकर ही जपान फिरत आहे. यावेळी तिने जपानमधील प्रसिद्धी ठिकाणी भेट दिली. तसंच अमृताचे जपानी पेहरावदेखील केला होता. याचे फोटो खूप व्हायरल झाले होते. त्यानंतर आज तिने जपानमधील काही सेल्फी फोटो शेअर केले आहेत. हे सेल्फी फोटो शेअर करत अमृताने कॅप्शनमध्ये लिहिलं, “चलो, तर तुम्ही माझा जपानचा प्रवास पाहिलाच असेल तर मला फोटोंमध्ये मी भेट दिलेल्या किमान २ ठिकाणांची नावं सांगा.”

अमृताच्या कॅप्शनप्रमाणे अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण, एका नेटकऱ्याने भलतीच प्रतिक्रिया दिली. त्या नेटकऱ्याने अमृताला विचारलं, “तुला मुलांची जबाबदारी नकोय वाटतं.” यावर अमृता खानविलकर म्हणाली की, या फोटोंचा आणि मुलांचा काय संबंध? नाही म्हणजे मी असं काय टाकलंय की, अरे हिला मुलं का नाहीयेत असं तुम्हाला वाटलं? उगाच हवेत बाण का सोडायचे?

नेटकऱ्याची प्रतिक्रिया

दरम्यान, अमृता खानविलकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘नटरंग’ या चित्रपटानंतर ‘फूंक २’, ‘अर्जुन’, ‘झकास’, ‘धूसर’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘सतरंगी रे’, ‘शाळा’, ‘आयना का बायना’, ‘हिम्मतवाला’, ‘बाजी’, ‘वेलकम जिंदगी’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘वन वे तिकीट’, ‘बस स्टॉप’, ‘राझी’, अशा अनेक मराठी, हिंदी चित्रपटात अमृता झळकली. अमृता जितकी चित्रपटामुळे चर्चेत होती तितकीच रिअ‍ॅलिटी शोमुळे चर्चेत राहिली. ‘नच बलिये’च्या ७व्या पर्वाचे विजेते अमृता आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा ठरले होते. ‘झलक दिखला जा’, ‘खतरों के खिलाडी’ अशा अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये तिने सहभाग घेतला होता. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘सुशीला सुजीत’ चित्रपटात अमृता झळकली आहे. या चित्रपटातील तिचं ‘चिऊ ताई चिऊ ताई दार उघड’ गाणं चांगलंच गाजलं. या गाण्यात अमृता आणि गश्मीर महाजनीचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे.