आज गुढीपाडव्यानिमित्त सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. कलाकार त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्याबरोबर मिळून गुढीपाडवा साजरा करत आहेत. मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर हिने देखील तिच्या घरी आज गुढी उभारली. पण यावेळी तिला भुरळ घातलेल्या गाण्यावर थिरकण्याचा मोह तिला आवरला नाही.
सध्या सर्वत्र ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची चर्चा आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. तर या चित्रपटातील गाण्याला देखील प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं सध्या खूप गाजतंय. अमृता खानविलकरला देखील या गाण्याने भुरळ घातली आहे. आता गुढी उभारल्यावर याच गाण्यावर तिने नाच केला.
अमृताने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये अमृता साडी नेसून गुढीची पूजा करताना दिसत आहे. तर गुढीची पूजा करून झाल्यानंतर ती ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यावर थिरकतानाही दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिलं, “तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा… नुकताच ‘महाराष्ट्र शाहीर’चा टीझर प्रदर्शित झाला आणि ह्यात काहीच शंका नाही की हा चित्रपट एक अविस्मरणीय अनुभव असणारे ….चित्रपटात अशी खूप मंडळी आहे ज्यांच्यावर मनापासून प्रेम आहे. लव्ह यू टीम.”
हेही वाचा : “गुडबाय…” अमृता खानविलकरने जाहीर केला मोठा निर्णय; चाहते काळजीत
तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांबरोबरच मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील तिचा हा अंदाज आवडला असल्याचं तिला सांगितलं. याचबरोबर तिच्या लूकचंही सर्वजण कौतुक करत आहेत.