लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोक छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा, त्यांचा इतिहास चर्चेत आहे. अनेकजण महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संबंधित ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून ज्याठिकाणी ठेवण्यात आलं होतं, ते ठिकाण म्हणून जे दाखवण्यात येणाऱ्या ठिकाणाला एका मराठी अभिनेत्रीने भेट दिली आहे. तिने संगमेश्वर कसबा येथील एका वाड्याचे काही फोटो शेअर केले आहेत.
‘कुटुंब’, ‘वहिनीची माया,’ ‘सुना’ येती घरा’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये व मराठी मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारी अभिनेत्री अर्चना नेवरेकर हिने केलेल्या सोशल मीडिया पोस्टची सध्या चर्चा होत आहे. ती नुकतीच कुटुंबाबरोबर संगमेश्वर कसबा येथे गेली होती. तेथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याबरोबर तिने फोटो काढले, तसेच त्यांना ज्या वाड्यात कैद केलं होतं तिथेही भेट दिली.
अर्चना नेवरेकरची पोस्ट
“संगमेश्वर कसबा जिथे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं…ही वास्तू नेमकी काय आहे? ती वास्तू पाहून मन खिन्न झाले. चांगले नाही वाटले…कदाचित म्हणूनच त्या वास्तूमध्ये खूपच भयाण सत्य लपलेलं आहे..तो वाडा दुःखी दिसतो…मी माझ्या मुलाबरोबर अशा बऱ्याच ठिकाणी जात असते जिथे आपला इतिहास, आपली संस्कृती त्याला समजली पाहिजे…”, असं अर्चनाने लिहिलं.
पुढे ती म्हणते, “प्रत्येक आई जिजाबाई नाही होऊ शकत. प्रत्येक घरात शिवाजी नाही जन्म घेऊ शकत. पण प्रत्येक घरात जिजाईचे संस्कार आणि हिंदुत्वाविषयी प्रेम प्रत्येक आई देऊच शकते…एक चांगला माणूस, चांगला नागरिक आणि चांगला भारतीय घरातूनच घडतो आणि घडवला पाहिजे…त्यासाठी पैशाची नाही तर मनाची तयारी लागते…मी माझ्या मुलाला नेहमी एकच गोष्ट शिकवते चांगला माणूस हो आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण छान जग,” असं अर्चनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
अर्चनाने शेअर केलेल्या फोटो व व्हिडीओमध्ये ती व तिचे कुटुंबीय संगमेश्वरमधील विविध ठिकाणांना भेटी देताना दिसत आहेत. तसेच छत्रपती संभाजी महाराजांना ज्याठिकाणी कैद करून ठेवलं होतं, त्या वाड्याच्या अवशेषाचे फोटोही तिने पोस्ट केले आहेत.