अनेकदा मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरविताना दिसतात. मराठी सिनेमांना थिएटर्स मिळत नाहीत, अशी वक्तव्ये बरेच कलाकार, दिग्दर्शक, निर्माते करताना दिसतात. आता अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी(Ashwini Kulkarni)ने नुकतीच ‘द पोस्टमन’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने मराठी सिनेमा, मराठी इंडस्ट्रीबद्दल वक्तव्य केले आहे. मराठी सिनेमा का चालत नाहीत, मराठी इंडस्ट्रीमधील सिनेमे ब्लॉकबस्टर का ठरत नाहीत, मराठी सिनेमे सातत्याने फ्लॉफ का ठरत आहेत, अशा अनेक विषयांवर अभिनेत्रीने वक्तव्य केले आहे. तिचे हे वक्तव्य चर्चेत असल्याचे दिसत आहे.
“मराठीच्या बाबतीत दुर्भाग्य…”
बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या तुलनेत मराठी सिनेमा सध्या कुठेय, त्याचे स्थान काय आहे, यावर अभिनेत्री म्हणाली, “बॉलीवूड किंवा दाक्षिणात्य चित्रपट यांचे बजेट आणि त्यांचे प्रेक्षक हे मराठी सिनेमाच्या तुलनेने खूप पटींनी जास्त आहेत. मराठी सिनेमाचं बजेट आणि प्रेक्षक हे खूप कमी प्रमाणात आहे. जर एखादा तेलुगू चित्रपट प्रदर्शित होत असेल, तर संपूर्ण दाक्षिणात्य इंडस्ट्री फक्त त्या भाषेतील चित्रपट बघते. ते हिंदी चित्रपटही बघतील, असं नाही. पण, मराठीच्या बाबतीत दुर्भाग्य असं आहे की, मराठी प्रेक्षकच मराठी सिनेमे बघत नाहीत. हिंदी, दाक्षिणात्य चित्रपट पाहणारा असा मराठी प्रेक्षक विभागला गेला आहे. या दोन बाबतीत मराठी सिनेमा मागे आहे. मात्र, जर कंटेट पाहिला, तर मराठी सिनेमात कंटेट खूप आहे. एका मोजक्या बजेटमध्ये खूप कमी प्रेक्षकांसाठी चांगला सिनेमा बनवणं हे खूप मोठं कौशल्य आहे. मला असं वाटतं की, या सगळ्या अतिक्रमणामध्ये मराठी चित्रपट टिकला आहे, हेही कमी नाहीये.”
मराठी इंडस्ट्रीमधील अनेक जण थिएटर्स मिळत नाहीत, असे म्हणतात. याच संदर्भात अश्विनी कुलकर्णी म्हणाली, “उदाहरणार्थ पुष्पा २ जर अमुक या तारखेला प्रदर्शित होणार आहे”, असं ६ महिने आधी सांगितलं आहे. तुम्ही जर त्याच दिवशी अमुक एखादा मराठी चित्रपट प्रदर्शित करीत आहात. मग तुम्ही ओरडताय की, थिएटर्स मिळत नाहीत. मराठी प्रेक्षक येत नाहीत. आम्हाला थिएटर्स मिळत नाहीत. थिएटरवाल्याचंसुद्धा बिझनेस आहे. समजा, तुमचा जर एखादा बिझनेस असेल. तर ज्या मालाला मागणी आहे, तोच तुम्ही विकणार ना? त्यामुळे प्रामाणिकपणे सांगायचं, तर थिएटरला ‘पुष्पा’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच वेळी एखाददुसरा चित्रपट लागला आहे. ज्याची फारशी हवा नाहीये किंवा मला एकूण त्याचा ट्रेलर बघून, त्यावर आता तितके पैसे खर्च करावेत की ओटीटीवर आल्यावर बघावा, जेव्हा हा विचार करायची वेळ येते. तर तेव्हा साहजिकच ‘पुष्पा’सारख्या चित्रपटांना प्राधान्य दिलं जातं. कारण- पैसे वसूल होतात. काही नाही तर अॅक्शन, डान्समध्ये होतात. अल्लू अर्जुनला बघून होतात. अजून काय पाहिजे. तो फरक आहेच ना?
हिरोइझम, अॅक्शन व इतर सगळ्या गोष्टींचा विचार ५०० रुपयांचं तिकीट काढताना होतो. त्यामुळे मराठी चित्रपट लोकांपर्यंत जितकं पोहोचणं गरजेचं आहे. तितकाच तो चित्रपट योग्य वेळी प्रदर्शित करणंदेखील महत्त्वाचं आहे. या सगळ्यात कलाकारांना सहन करावं लागतं. कारण- आम्ही लोकांनी आपल्याला बघावं, यासाठी मराठी सिनेमात काम करीत असतो. या सगळ्या घडामोडींमुळे निर्मात्यांनी ‘पुष्पा’बरोबर चित्रपट प्रदर्शित केला. निर्मात्यांचं पैशांमध्ये नुकसान होतं. करिअरचं नुकसान हे कलाकारांचं होतं. कारण- मी केलेलं कामच लोक बघत नाहीयेत. तर काय उपयोग आहे या कामाचा? असं होतं.”
“तुम्ही म्हणाल की, पैसे तर कलाकारांना मिळालेले असतात. पैसे तर मला बँकेत नोकरी करूनही मिळाले असते. जर मी अभिनय क्षेत्रात आले आहे, तर मला पैशाबरोबरच माझं काम लोकांनी बघावं ही अपेक्षा असते. थिएटर्स मिळत नाहीत, पब्लिसिटी नीट होत नाही, चित्रपट प्रदर्शितच होत नाहीत, एका वेगळ्या चित्रपटासाठी आपला चित्रपट दाबला जातो या सगळ्या भांडणात या सगळ्याचा एकत्रित परिणाम कोणावर होत असेल, तर तो कलाकारांवर होत असतो. कारण- आम्ही प्रेक्षकांना दिसत असतो.”