मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील व मराठा समाज आंदोलन करत आहे. जरांगे पाटील व मराठा समाजातील आंदोलक मोर्चा घेऊन मुंबईत दाखल होणार आहे. परवानगी मिळाली नसूनही ते मुंबईत मोर्चा घेऊन येण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांचं हे आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू आहे, अशातच मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेने मनोज जरांगेंबद्दल केलेली पोस्ट चर्चेत आहे.

साधं फिरायला जाऊन घरी परतलो, तरी पुढचे २ ते ३ दिवस “फार दमलो” म्हणत काढतो आपण.
पण हा माणूस.. एक भाबडा म्हणावं की वेडा म्हणावं. आलेल्या हजारो संकटांना या माणसाने याच्या सहज बोलण्याने, खरेपणाने परतवून लावले. आज लाखो मुलांच्या डोळ्यांत एक स्वप्नं आहे की आता तरी न्याय मिळेल.
हा विश्वास या माणसाने त्याच्या आरक्षणाप्रती असलेल्या सातत्याने, समाजाप्रती असलेल्या प्रेमाने निर्माण केला, टिकवला, वाढवला.
म्हणूनच आज समाजाचा एक भाग म्हणून या आंदोलनात सोबत करणे हे माझे कर्तव्य वाटते.
हा फोटो माणूस म्हणून बघाल तर जीवाची घालमेल होईल.
टीप – माझे कलाकार म्हणून काम पाहणारे आणि माझ्यावर प्रेम करणारे हे एका समाजाचे नाहीत तर ते १२ बलुतेदार, १८ पगड जातीचे आहेत. आज मी मराठा आंदोलनात सहभाग दर्शवणे म्हणजे त्या सगळ्या लोकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय व्हावा असे अजिबात नाही, समाजातील सर्वच घटकांना समान न्याय मिळावा हेच माझे मत, अशी पोस्ट अश्विनी महांगडेने केली आहे.

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’मध्ये अनघाची भूमिका साकारत अभिनेत्री अश्विनी महांगडे सर्वांचीच लोकप्रिय झाली. मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं. तिने सोशल मीडियावर आपली मतं व विचार ठामपणे मांडत असते.

Story img Loader