“नाटक हा माझा प्राण आहे,” हे वाक्य अक्षरशः जगलेल्या आणि एकेकाळी मराठी रंगभूमी आपल्या लक्षवेधी अभिनयानं गाजवणाऱ्या चतुरस्र अभिनेत्री म्हणजे भक्ती बर्वे. भूमिकेविषयी त्या अत्यंत बारकाईनं अभ्यास करायच्या. ती भूमिका किती लांब आहे, याचा त्यांनी कधीच विचार केला नाही. पण त्यांनी प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. त्यामुळे आजही म्हटले जातं, ” ‘ती फुलराणी’ पुन्हा होणे नाही.” रंगमंचावरील सम्राज्ञी, असं त्यांना ओळखलं जायचं. जरी कुठल्या विक्रमाची नोंद त्यांच्या नावे नसली तरी त्यांचं काम आजच्या कलाकारांसाठी स्फूर्तिदायक आहे. ज्यांनी मराठी रंगभूमीला एक नवा आयाम दिला होता, त्या भक्ती वर्बे कोण हे आजच्या पिढीतल्या बऱ्याच जणांना माहीतदेखील नसेल. हे मोठं दुर्दैव आहे. आज त्यांच्याविषयी फार कमी बोललं जातं. पण, आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांच्या आकाशवाणी, दूरदर्शन ते नाटक, मालिका, चित्रपट या प्रवासाविषयी जाणून घेऊ.

१० सप्टेंबर १९४८ सालचा भक्ती बर्वे यांचा सांगलीतला जन्म. बालपणापासूनच नाटकाची आवड. ‘अल्लाउद्दीन’, ‘जादूचा दिवा’, ‘वयं मोठं खोटम्’ अशा बालनाट्यांमध्येच त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. “बातम्या नुसत्या ऐकू नका; उच्चार ऐका, गाणं नुसतं ऐकू नका; उच्चार ऐका” ही त्यांना बालरंगभूमीवर मिळालेली शिकवणं त्यांनी कायम लक्षात ठेवली. त्यामुळे उच्चारांवर त्यांची जबरदस्त पकड होती. त्यांनी फक्त मराठीच नाही, तर हिंदी, गुजराती या भाषांमध्येही नाटकं केली. ‘अखेरचा सवाल’, ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘आई रिटायर होतेय’, ‘आधे अधुरे’, ‘आले देवाजीच्या मना’, ‘गांधी आणि आंबेडकर’, ‘ती फुलराणी’, ‘रंग माझा वेगळा’, ‘रातराणी’ अशा बऱ्याच नाटकांत त्यांनी भूमिका निभावल्या आहेत. ‘ती फुलराणी’मधली ‘मंजुळा’ आणि ‘आई रिटायर होतेय’ या नाटकातली ‘आई’ची या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. ‘ती फुलराणी’चे त्यांनी ११११ हून अधिक प्रयोग केले; तर ‘आई रिटायर होतेय’चे ९५० प्रयोग झालेत. अशा या चतुरस्र अभिनेत्रीला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे.

Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
Mammootty breaks silence
Mammootty : “चित्रपट म्हणजे समाजाचं प्रतिबिंब, त्यात..” ; हेमा समितीच्या अहवालावर अभिनेते मामुट्टींनी सोडलं मौन
amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”
pravin tarde and dev gill
“प्रवीण तरडेंना लोकांनी कामाचे स्वातंत्र्य…”, ‘अहो विक्रमार्क्रा’ चित्रपटातील सहकलाकाराचे मोठे वक्तव्य
shraddha kapoor new house set become akshay kumar neighbour in juhu on rent
कोट्यवधींची मालकीण असून श्रद्धा कपूर राहणार भाड्याने; जुहूमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या शेजारी घेणार फ्लॅट

हेही वाचा – ‘दादा कोंडके, कृष्णाष्टमी आणि जीवनमरणाच्या हिंदोळ्यावर’

भक्ती बर्वे यांनी फक्त अभिनेत्रीची भूमिकाच नाही, तर वृत्तनिवेदिकेची भूमिकाही चांगलीच गाजवली. त्या काळात टीव्हीवरील त्यांचा चेहरा लोकप्रिय होता. आकाशवाणीला काम केल्यानंतर ७०-८० दशकांत त्यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून काम केलं; शिवाय दूरदर्शनवरील काही मालिकांमध्येही त्यांनी काम केलं. बहिणाबाईंच्या गाण्यांवर आधारित असलेल्या ‘बहिणाबाई’ या सांगीतिक कार्यक्रमात त्या झळकल्या होत्या. त्यासाठी त्या अहिराणी लकबीचे शब्दोच्चार शिकल्या होत्या. एवढंच नाही, तर जात्यावर दळण दळताना ओवी गाणारी बाई कशी बसेल? हे शिकण्यासाठी भक्ती बर्वे जात-प्रांताच्या काही महिलांना भेटल्या. एका बाजूला हे सर्व सुरू असताना त्या दुसऱ्या बाजूला नाटकही करीत होत्या.

अशातच त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत आणि मालिकाविश्वात लोकप्रिय अभिनेते शफी इनामदार यांच्याशी लग्न केलं. ‘ये जो है जिंदगी’ ही शफी यांची गाजलेली मालिका. १३ मार्च १९९६ साली शफी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यानंतर काही काळानं भक्ती यांनी मालिकांत कामं करायला सुरुवात केली. ‘घरकुल’ मालिकेतून त्या घराघरात पोहोचल्या. मात्र, १२ फेब्रुवारी २००१ रोजी काळानं त्यांच्यावर घाला घातला. वाईमधला प्रयोग करून मुंबईला परतत असताना त्यांच्या भरधाव गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्येच त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – “प्लीज मराठी चित्रपटात घ्या, मी उत्तम मराठी बोलते”; शाहरुख खानबरोबर ‘जवान’ चित्रपटात काम करणाऱ्या गिरीजा ओकचं वक्तव्य

भक्ती बर्वे यांनी या संपूर्ण कारर्किदीमध्ये फक्त दोनच चित्रपट केले. एक म्हणजे १९८३ साली ‘जाने भी दो यारों’ व १९९८ साली ‘चौरसिया की माँ’ या दोन चित्रपटांत त्यांनी काम केलं होतं. भक्ती बर्वे यांच्याबरोबर कामं केलेल्या काही कलाकारांनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेली मतं …

भक्ती बर्वे मी आतापर्यंतच्या आयुष्यात पाहिलेल्या अभिनेत्रींमध्ये सर्वांत महान अभिनेत्री : नसिरुद्दीन शाह

‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या एका मुलाखतीमध्ये ‘जाने भी दो यारों’ या चित्रपटाविषयी बोलत असताना नसिरुद्दीन शाह म्हणाले होते की, जाने भी दो यारों या चित्रपटाच्या वेळी आम्ही एका भूमिकेसाठी अगदीच पेचात पडलो आणि मी त्यावेळी पुण्यात शूटिंग करीत होतो. तर तो (कुंदन शाह) माझ्याकडे आला आणि म्हणाला यार आता कोणाला घ्यायचं? तर मी त्याला म्हटलं, हे बघ भक्ती बर्वे नावाची एक अभिनेत्री आहे; जी आज रात्री एका नाटकात काम करणार आहे आणि त्या नाटकाचं नाव ‘हँड्स अप’ आहे. मला वाटतं भक्ती बर्वे मी आतापर्यंतच्या आयुष्यात पाहिलेल्या अभिनेत्रींमध्ये सर्वांत महान अभिनेत्री होती. मी भक्तीची रंगमंचावरची बरीचशी कामं पाहिली आहेत. ती खूपच कमाल होती. तिचं काम समोरच्याला थक्क करणारं होतं. मी त्याला (कुंदन शाह) म्हणालो बघ, चल आपण जाऊ या आणि तिचं काम बघू या. आम्ही ते नाटक बघायला गेलो आणि तिथल्या तिथे तो पुरावा होता भक्तीच्या क्षमतेचा. त्यानं लगेच ठरवून टाकलं आणि अशा प्रकारे भक्ती या प्रोजेक्टमध्ये सामील झाली.”

एकदा त्यांची रंगमंचावर ‘एन्ट्री’ झाली की … : चंद्रकांत कुलकर्णी

“भक्तीताईंचा रंगमंचावरचा ‘वावर’ हा फक्त पाहत राहावा, असा होता. त्यात एखाद्या सम्राज्ञीचा तोरा होता. सहजता होती. लवचिकता होती. एक रुबाब होता. एक दरारा होता. त्या- त्या भूमिकेतला त्यांचा संचार हा ‘थरारक’ असायचा. एकदा त्यांची रंगमंचावर ‘एन्ट्री’ झाली, की काय बिशाद की तुमची नजर इतर पात्रांवर, हालचालींवर जाईल! एक प्रकारची ‘खिळवून’ टाकण्याची, संमोहित करण्याची शक्ती त्यांच्या अभिनयात होती. रंगमंचावरील हालचाली, कृती, व्हॉइस प्रोजेक्शन याविषयी त्यांना अचूक अंदाज होता. अनुभवागणिक त्यांनी त्यावर प्रभुत्व मिळवलं होतं,” असं चंद्रकात कुलकर्णी म्हणाले होते.

हेही वाचा –“मराठी लोकांमध्ये एकी पाहिजे”; अभिनेते संदीप कुलकर्णी असं का म्हणाले?

भक्ती कधी कुणाला कळलीच नाही : ज्येष्ठ पत्रकार भरत कुमार राऊत

भरत कुमार यांनी फेसबुकवर भक्ती बर्वे यांच्याविषयी एक पोस्ट लिहीली होती. त्यात त्यांनी लिहीलं होतं की, “भक्तीची अनेक रूपं. रंगभूमीवर किंवा टीव्हीच्या सेटवर मेकअप करून, ती उभी राहिली की, वेगळीच दिसायची, तशीच प्रत्यक्ष जीवनातही ती वेगवेगळी रूपं घेऊन वावरली. त्यामुळेच असेल कदाचित, भक्ती कधी कुणाला कळलीच नाही. हत्ती आणि सहा अंधांच्या गोष्टीत जसा प्रत्येक अंधाला हत्ती वेगवेगळा वाटतो, तसंच भक्तीच्या बाबतीत होत राहिलं. फरक इतकाच की, भक्ती एकाच माणसालाही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी वाटायची आणि भासायची. अनेकदा मैत्रीण म्हणून भक्ती जितकी प्रेमळ आणि हवीहवीशी वाटायची, तितकीच सहकारी म्हणून तापदायक ठरायची. काम चालू असताना अद्वातद्वा बोलणारी भक्ती बातमीपत्र झालं की, आग्रहानं चहाला बोलवायची आणि प्रेमानं तासन् तास गप्पा मारायची. यातली खरी भक्ती कुठली? बातम्यांची तयारी चालू असताना जीवन नकोसं करणारी की चहाच्या टेबलवर गप्पा मारणारी? खरं तर भक्ती तीच; पण भूमिका बदलली की, त्याप्रमाणे तिचं वागणं-बोलणंही बदलत असे. पण, हे फारच थोड्यांना उमगलं.”