९०च्या दशकापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेल्या आणि सध्या विविध मालिकांमध्ये झळकणाऱ्या अभिनेत्री छाया सांगावकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नेहमी फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. पण गेल्या काही दिवसांपूर्वी त्या ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्याविषयी लिहिताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर घडलेले किस्से सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी छाया यांनी कुलदीप पवार यांच्याविषयी लिहिलं होतं. त्यानंतर आज त्यांनी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्याविषयी लिहिलं आहे.
छाया सांगावकर यांनी राजशेखर यांचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “मराठीचा प्राण, खतरनाक खलनायक, माझे मानसबंधु, ज्येष्ठ अभिनेते राजशेखर व त्यांची पत्नी अभिनेत्री वैशालीताई भुतकर यांच्याविषयी…भैय्यांना मी अभिनेता म्हणून ओळखत होतेच. पण, भैय्यांची व माझी ओळख ही त्यांची पत्नी व अभिनेते स्वप्नील राजशेखरच्या आई वैशालीताई यांच्यामुळे जास्त झाली. कारण वैशालीताई बरोबर मी बऱ्याच नाटकात काम केलं.”
पुढे छाया यांनी लिहिलं, “पूर्वी गोवा किंवा संपूर्ण कोकणात आणि इतर खेडेगावात, नाट्यमंडळ असायचं. पुरुष कलाकार मंडळातलेच असायचे. ते फक्त स्त्री अभिनेत्री बाहेरुन घेऊन नाटकाचा प्रयोग करायचे. मग काही वेळेला मी व वैशालीताई असायचो. कधी कधी गंगावेस या बसस्टँडवरुन कोकणात जाणाऱ्या गाडीने जावं लागतं. तर भैय्यांचं घर तिथून जवळ असायचं म्हणून मला पहिलं ताईकडे जावं लागायचे. मग म्हणता म्हणता भैय्यांबरोबर माझं नातं जमलं. ते मला आपली लहान बहीण मानू लागले. मग काय, चेष्टा मस्करीला उधाण यायचं. ते माझी खूप छेड काढायचे. ताईला म्हणायचे आली बघ गं, तुझ्या नाकातला केस, तुझी लाडकी छाया. मी चिढायची. काय हो भैय्या, कुणी असं ऐकलं तर लोकं काय म्हणतील? मग ते म्हणायचे, लोकांना माहीत आहे नाकातला केस म्हणजे काय ते. मी ताईंना म्हटलं, भैय्या मला नाकातला केस असं का म्हणतात ? तेव्हा त्या म्हणाल्या, अगं तू माझी लाडकी आहेस ना म्हणून म्हणतात. नाकातला केस, तो जरा जरी ओढला गेला तर खूप दुखतं. तसं तुझ्या बाबतीत कुणी बोललं की मला राग येतो, दुःख होतं, म्हणून म्हणतात. अच्छा…”
“हा असा जिव्हाळा असलेलं माझं हक्काचं घर. आज भैय्या आमच्यात नाहीत, पण तो जिव्हाळा ते प्रेम, तो आदर आज ही भुतकर कुटुंबात आहे. भैय्यांची तिन्ही मुलं, स्वप्नील, राहुल आणि नितीन आत्या म्हणतात (पण सगळे छायाताईच म्हणतात). आणि त्यांचा नातू राज राजशेखर, माझा तितकाच आदर व प्रेम करतात. हे सुध्दा भाग्य असावं लागतं आणि ते मला मिळालं आहे,” असं छाया सांगावकर यांनी लिहिलं आहे.
दरम्यान, छाया सांगावकर यांची ‘तुझ्या जीव रंगला’ या मालिकेतील भूमिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत त्यांनी गोदाक्काची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्या बऱ्याच मालिकांमध्ये झळकल्या.