Marathi Actress Deepali Sayed : अलीकडच्या काळात अनेक मराठी कलाकारांनी वैयक्तिक आयुष्यात नवनवीन व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केल्याचं पाहायला मिळत आहे. रेश्मा शिंदे, अनघा अतुल, तेजस्विनी पंडित, अक्षरा देवधर, सई ताम्हणकर, प्रिया बापट, हार्दिक जोशी, महेश मांजरेकर, निरंजन कुलकर्णी अशा बऱ्याच कलाकारांनी गेल्या काही महिन्यांमध्ये कपड्यांचे व ज्वेलरी ब्रँड्स तर, काहींनी स्वत:चं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. आता यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे.
मराठी मालिका, चित्रपट तसेच अनेक लोकप्रिय जाहिरातींमध्ये काम करून दिपाली सय्यद यांनी घराघरांत लोकप्रियता मिळवली. गेल्या काही वर्षांपासून त्या राजकीय क्षेत्रात शिवसेना ( एकनाथ शिंदे ) पक्षाच्या नेत्या काम पाहत आहेत. अनेक सामाजिक कार्यात देखील त्या सक्रियपणे सहभागी होत असतात. या अभिनेत्रीने नुकतीच एका नव्या व्यवसायाची सुरूवात केली आहे. त्यांनी नव्या व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करत, शिर्डी येथे भाविकांसाठी नवीन हॉटेल सुरू केलं आहे.
हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
शिर्डी येथे दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. साईबाबांच्या भक्तांचं हे श्रद्धास्थान आहे. दररोज हजारो भाविक याठिकाणी दर्शन घेतात. याच पार्श्वभूमीवर दीपाली सय्यद यांनी शिर्डीत ‘मनी हॉटेल अँड रेस्टॉरंट’ सुरू केलं आहे. दीपाली यांच्या हॉटेलला काही दिवसांपूर्वीच भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, आमदार देवयानी फरांदे यांनी सदिच्छा भेट दिली होती. सध्या राजकीय तसेच मनोरंजन विश्वातून अभिनेत्रीला नव्या व्यवसायासाठी भरभरून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
दरम्यान, दीपाली सय्यद यांच्या मनोरंजन विश्वातील भूमिकांविषयी सांगायचं झालं तर, त्यांनी आजवर ‘मुंबईचा डबेवाला’, ‘करायला गेलो एक’, ‘लग्नाचा धुमधडाका’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. ‘ढोलकीच्या तालावर’ या शोच्या परीक्षक म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे काम करत आहेत.