लोकप्रिय कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या बातमीमुळे मराठी, हिंदी मनोरंजनसृष्टी हादरली आहे. एक उमदा कलाकार गेल्याने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. सध्या विविध क्षेत्रांतून नामवंत मंडळी हळहळ व्यक्त करत आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून नितीन देसाई यांना श्रद्धांजली देत आहेत. नुकतीच अभिनेत्री हेमांगी कवी हिनं पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिनं नितीन देसाईंबरोबरच्या पहिल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
अभिनेत्री हेमांगी कवीनं ‘तमाशा’ या चित्रपटाच्या टीमचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये नितीन देसाईसुद्धा दिसत आहेत. हा फोटो शेअर करत हेमांगीनं लिहिलं आहे की, “जेव्हा इतक्या मोठ्या नावाच्या माणसाचा अंत असा होतो तेव्हा मनात प्रश्नांचं काहूर माजतं. मन उत्तरं शोधू लागतं. ती मिळत नाहीतच, मग आपण जरतरच्या गोष्टी बोलू लागतो. काहीबाही धंडाळू लागतो, काय ते कळत ही नाही. पोटात खड्डा पडला बातमी ऐकून. मनात, अंगात थरथर आहे. आत खोलवर धडधडतंय आताही हे लिहिताना. नितीन सर, तुम्ही आदर्श उदाहरण होतात आमच्यासारख्या लोकांसाठी. स्वप्न मोठी कशी बघायची, ती सत्यात कशी उतरवायची याचं भव्यदिव्यतेचं प्रतीक होतात. ‘होतात’ हा शब्द लिहावा लागतोय आज, छे..”
“२०१६ मध्ये माझा दादा फोर्टिस हॉस्पिटल (Fortis hospital) मध्ये अॅडमिट होता. समोरच्या बेडवर तुम्ही होतात. तेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा भेटले होते. माझ्या दादाचं नाव नितीन, वडिलांचं नाव चंद्रकांत हे जेव्हा मी तुम्हाला सांगितलं तेव्हा म्हणाला होतात, “अरे, म्हणजे देसाई आणि कवी याचाच काय तो फरक. बघा हं, दोघांची औषधं, उपचार इकडे तिकडे व्हायची.” हे ऐकून डॉक्टर आणि नर्सेससकट आम्ही हसलो होतो. आज पटकन तेच आठवलं.”
हेही वाचा – नितीन देसाई यांनी लूक का बदलला होता? त्यांनीच सांगितलेलं दाढी वाढविण्यामागचं कारण
पुढे हेमांगीनं लिहिलं आहे की, “प्रत्येक माणूस जाणारच आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, पण जेव्हा इतका यशस्वी, हिंदी सिनेमा, मालिका वर्तुळात नाव कमावलेला; ते नाव टिकवून ठेवलेला मराठी माणूस आपलं आयुष्य असं संपवतो तेव्हा आमच्यासारख्या छोट्या लोकांचा आत्मविश्वास हलतो. निःशब्द व्हायला होतं. असा निर्णय घेताना तुमचं काय झालं असेल याचा किंचितसा अंदाजही कुणी लावू शकणार नाही. पण, आता जिथे कुठे असाल तिथे शांत असाल. या मटेरिअॅलिस्टिक जगाच्या सगळ्या गराड्यातून दूर, मुक्त!”