‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून ऋता दुर्गुळेला ओळखलं जाते. सध्या ऋता ही तिच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ऋता दुर्गुळेचा ‘सर्किट’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच ऋताने नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटाबद्दल भाष्य केले.
ऋता दुर्गुळे आणि वैभव तत्त्ववादी यांचा ‘सर्किट’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. याबरोबरच नागराज मंजुळेंचा ‘घर, बंदूक, बिरयानी’ हा चित्रपटही आज प्रेक्षकांच्या भेटीला आहे. यामुळे दोन मोठे मराठी चित्रपट एकत्र प्रदर्शित झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ऋताला ‘दोन मोठे चित्रपट एकत्र येतात तेव्हा अभिनेत्री म्हणून काय वाटत असतं?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : Video : “नागराज मंजुळेंचे आकाशवर जास्त प्रेम”; सल्या, बाळ्या, प्रिन्स आणि जब्याने व्यक्त केली नाराजी, म्हणाले “त्यांनी आम्हाला…”
ऋता दुर्गुळे काय म्हणाली?
“एक अभिनेत्री म्हणून माझं फार प्रांजळ मत आहे की, दोन्हीही चित्रपट चालावेत. मी प्रामाणिकपणे हे सांगते. कारण अनेकदा मी स्वत:च स्वत:च्या चित्रपटाला रिप्लेस केलं आहे. माझ्या पहिल्याच चित्रपटावेळी असं झालं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही तो चित्रपट पण पाहा, हा चित्रपट पण पाहा आणि जर तिसरा एखादा चित्रपट येत असेल तर तो देखील पाहा.
दोन्हीही चित्रपटांचे टार्गेट ऑडियन्स हे वेगळे आहेत. पण एक अभिनेत्री म्हणून डोक्यात पहिला विचार हाच येतो की, सर्व इंडस्ट्री चालू दे. प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणं खूपच गरजेचं आहे. सध्या त्याची फार गरज आहे.
माझा हा तिसरा चित्रपट आहे. पण तिसऱ्या चित्रपटापासूनच प्रेक्षकांना सांगावं लागतंय की चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहा. मला त्याची काहीही खंत वाटत नाही. मी तर प्रेक्षकांना घरोघरी जाऊनही चित्रपटगृहात चित्रपट पाहा, असं सांगू शकते”, असे ऋता दुर्गुळे म्हणाली.
आणखी वाचा : पहिला प्रपोज ते सेलिब्रिटी क्रश, नागराज मंजुळेंनी केला खुलासा; म्हणाले “आता सांगण्यात…”
दरम्यान ‘सर्किट’ हा ऋता दुर्गुळेचा तिसरा चित्रपट आहे. तिने आतापर्यंत अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. ऋताने ‘दुर्वा’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती ‘फुलपाखरु’ या मालिकेत झळकली. या मालिकेमुळेच ती प्रसिद्धीझोतात आली. ऋताने ‘अनन्या’ आणि ‘टाइमपास ३’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.