‘जत्रा’, ‘फक्त लढं म्हणा’ अशा दर्जेदार मराठी चित्रपटांमुळे अभिनेत्री क्रांती रेडकर घराघरांत पोहोचली. क्रांती ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनेत्रीने २०१७ मध्ये एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी लग्न करुन वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. क्रांती नेहमीच नवऱ्याला खंबीरपणे साथ देताना दिसते. दोघेही एकमेकांना १९९७ पासून ओळखतात. क्रांती आणि समीर यांचे पदवीचे शिक्षण एकाच महाविद्यालयात झाले होते. त्यानंतर दोघांचे लग्न कसे जुळले? आणि किती वर्षांनी लग्न झाले? याबाबत दोघांनीही नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांनी प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोल यांच्या ‘कपल ऑफ थिंग्ज’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी दोघांनाही त्यांच्या लग्नाचे अनेक किस्से प्रेक्षकांना सांगितले. क्रांती आणि समीर यांची एकमेकांशी १९९७ पासून ओळख होती मात्र, कॉलेजच्या दिवसात ते दोघेही एकमेकांचा प्रचंड राग करायचे. यानंतर या भांडणाचे रुपांतर तब्बल १० वर्षांनी मैत्रीमध्ये झाले. पुढे जवळपास ५ ते ६ वर्ष एकमेकांच्या संपर्कात राहिल्यावर दोघांनीही २०१७ मध्ये लग्न केले.
हेही वाचा : “बोबडी वळणे, जीभ जड होणे अन् शब्द…”, दिग्दर्शक विजू माने आणि गुलजार यांच्या पहिल्या भेटीचा न ऐकलेला किस्सा
लग्नाविषयी सांगताना समीर वानखेडे म्हणाले, मला आमच्या लग्नाची तारीख किंवा आमच्या लग्नाचा वाढदिवस कधीच लक्षात राहत नाही कारण, ३ वेगवेगळ्या पद्धतीने आमचे लग्न झाले आहे. क्रांती लग्नाच्या वाढदिवसावरून मला अनेकदा टोमणे मारते पण, माझा अनेक गोंधळ होतो. सगळ्यात आधी आम्ही दोघांनी रुईया महाविद्यालयाजवळ असलेल्या मंदिरात हिंदू धर्माप्रमाणे लग्न केले. मंदिरात लग्न करण्याची क्रांतीची इच्छा होती. या वेळी आमचे काही जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर दुसऱ्यावेळी आमचे मराठी पद्धतीने लग्न झाले. त्यानंतर तिसरे लग्न आमचे कोर्टात झाले. पुढे दोन वेळा रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे मला निश्चित तारीख खरंच माहिती नाही.
हेही वाचा : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लवकरच घेणार ‘या’ लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, पहिला लूक आला समोर
क्रांती याविषयी सांगताना म्हणाली, “अनेक पद्धतीत लग्न झाल्याने ते नेहमी तारीख विसरतात. पण माझ्या लक्षात आहे की, १५ जानेवारी २०१७ ला आमचे अधिकृतपणे लग्न झाले आणि आम्ही दरवर्षी १५ जानेवारीला लग्नाचा वाढदिवस साजरा करतो.” दरम्यान, आता दोघांच्या लग्नाला ६ वर्ष पूर्ण झालेली आहेत. या जोडप्याला झिया आणि जायदा नावाच्या दोन जुळ्या मुली आहेत. क्रांती या दोघींचा चेहरा न दाखवता त्यांचे अनेक व्हिडीओ आणि किस्से सोशल मीडियावर शेअर करत असते.