गेल्या काही वर्षांत क्षिती जोग(Kshitee Jog) व हेमंत ढोमे हे विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे वेगळ्या धाटणीच्या कथा असल्याने प्रेक्षकांची त्यांच्या चित्रपटांना मोठी पसंती मिळत असल्याचे दिसले. यामध्ये ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र, त्यांच्या ‘सनी’ या चित्रपटाला अपयश मिळाल्याचे पाहायला मिळाले. आता अभिनेत्री व निर्माती क्षिती जोगने ‘सनी’ चित्रपटाला जे अपयश मिळालं त्यातून काय शिकायला मिळालं, कोणत्या गोष्टी लक्षात आल्या, यावर वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेळीच शिकवण…

क्षिती जोगने नुकतीच अमोल परचुरेंच्या कॅचअप या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. ‘सनी’ अपयशी ठरला तर निर्माती म्हणून त्यातून काय शिकायला मिळालं? यावर बोलताना क्षितीने म्हटले, “खूप शिकायला मिळालं. सगळ्यात महत्त्वाचं हे शिकायला मिळालं की, कोणत्याच गोष्टीला गृहीत धरू नका. ‘झिम्मा’नंतर आम्ही ‘सनी’ हा चित्रपट केला. तर त्यामुळे वाटलं की लोकांना हे आवडणार आहे, हे होणारच आहे. त्या चित्रपटावर मला अभिमान आहे. तो चित्रपट जसा झाला आहे, त्याबद्दल मला प्रचंड आनंद आहे. त्याचा जो कंटेंट आहे, लोकांनी जी कामं केली आहेत; ‘झिम्मा’नंतरचं त्या चित्रपटातील मला हेमंतचं खरंच काम आवडलं होतं. पण, हे शिकायला मिळालं की गोष्टी गृहीत धरू नये. एक ‘झिम्मा’ चालला म्हणजे पुढचं सगळं चालेलंच असं नाही. माझ्या बाजूने अभ्यास कमी पडला. त्याची रिलीज डेट, कदाचित प्रमोशन किंवा होणारी पब्लिसिटी हे सगळं माझ्या बाजूने कमी पडलं असं मला दरवेळी वाटतं. त्यानंतर आम्ही या सगळ्याचा अभ्यास निक्षून करू लागलो. मला आता असं वाटतं की, एक प्रकारे बरं झालं. तो चित्रपट चालला नाही, लोकांना बघायला मिळालं नाही, याचं वाईट वाटतं. पण, वेळीच शिकवण आली”, असे म्हणत क्षितीने ‘सनी’ अपयशी ठरला असला तरी त्यातून शिकायला मिळाले, असे म्हटले आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची निर्माती क्षिती जोग आहे. याबरोबरच ती अमेय वाघ व सिद्धार्थ चांदेकर यांच्याबरोबर मुख्य भूमिकेतही दिसली आहे. भावंडांवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, क्षिती जोगने करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ या चित्रपटात महत्वाची भूमिका निभावली आहे. याबरोबरच क्षितीने साडे आठ वर्षे लोकप्रिय हिंदी मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये काम केले आहे. आता तिचा ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress kshitee jog on failure of sunny marathi movie reveals what she learn from that nsp