१९९८ साली सुरू झालेली ‘सीआयडी’ (CID) मालिका तुफान गाजली. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. आजही बऱ्याच प्रेक्षकांना ‘सीआयडी’ मालिकेचं वेड आहे. मालिकेचे जुने भाग प्रेक्षक आवडीने बघत असतात. याच मालिकेतून ‘कुछ तो गडबड है’ असं म्हणत घराघरात पोहोचले एसीपी प्रद्युम्न म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. काही दिवसांपूर्वी शिवाजी साटम यांची सून अभिनेत्री मधुरा वेलणकर हिने त्यांचं कौतुक केलं.

अभिनेत्री मधुरा वेलणकरने ‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेलला काही दिवसांपूर्वी मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने सासऱ्यांसह ‘सीआयडी’ मालिकेतील इतर कलाकारांचं कौतुक केलं होतं. मधुरा काय म्हणाली होती? वाचा…

हेही वाचा – “माझ्या आयुष्यातल्या…”, पूजा सावंतची बहिणीसाठी खास पोस्ट; रुचिरा सावंत काय काम करते? जाणून घ्या…

मधुरा म्हणाली होती, “खरं सांगायचं झालं तर मला अतिशय अभिमान आहे यागोष्टीचा की माझे सासरे २३ वर्ष ‘सीआयडी’ सारखी मालिका करत होते. सर्वाधिक चालेली ही मालिका होती. कधीही ती मालिका रटाळ झाली नाही. त्यांची ही एक प्रकारे नोकरीच होती. जसं २०, २३ वर्ष माणसं नोकरी करतात अगदी तसंच होतं.”

पुढे अभिनेत्री म्हणाली, “‘सीआयडी’ मालिकेतील सगळे कलाकार खूप गोड माणसं आहेत. त्यांनी इतके वर्ष काम केलं. पण त्यांच्या वागण्यात अजिबात कुठे गर्व नाहीये. माणूस म्हणून खूप गोड माणसं आहेत. माझे सासरे सगळ्यात मोठे आहेत. त्यांना अतिशय आदराने आणि प्रेमाने त्यांची काळजी घेतात. आजही ते कलाकार ‘सीआयडी’ संपल्यानंतरही त्यांच्या संपर्कात आहेत. ते एकत्र काम करतात, एखाद्या कार्यक्रमाला एकत्र जातात. त्यांचं जे नातं तयार झालंय, ते शब्दात वर्णन करण्यासारखं नाहीये.”

हेही वाचा – Oscar 2024: एकदा नाही तर दोनदा जिंकला ‘या’ बहीण-भावाच्या जोडीने ऑस्कर! ८७ वर्षांचा रेकॉर्ड मोडला

दरम्यान, मधुराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मधुरासह मुक्ता बर्वे, श्रुती मराठे, सुबोध भावे, उमेश कामत, आनंद इंगळे आणि अतुल परचुरे झळकणार आहेत. २९ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader