‘देवमाणूस’, ‘रानबाजार’ या कलाकृतींमुळे अभिनेत्री माधुरी पवार घराघरांत लोकप्रिय झाली. ती उत्तम नृत्यांगणा देखील आहे. सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीत काम करताना माधुरीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मेहनतीच्या जोरावर आज अभिनेत्रीने मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतीच ती गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात झळकली होती. माधुरीचा संघर्ष भारावून टाकणारा आहे. नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये सुरुवातीच्या काळात तिला आलेला अनुभव सांगितला आहे.

माधुरी पवार याबद्दल सांगताना म्हणाली, “मी सुरुवातीच्या काळात मुंबईत आणि अर्थात या इंडस्ट्रीत काम करण्यासाठी आले. उराशी खूप स्वप्न आणि आशा घेऊन मी मुंबईत आले होते. पण, इंडस्ट्रीत घडणाऱ्या खूप गोष्टी माणसाला आपण आउटसाइडर आहोत याची जाणीव करून देणाऱ्या घडल्या. मी कोणाचं नाव घेणार नाही कारण, कोणालाही दुखावण्याची भावना माझ्या मनात नाही. पण, एक किस्सा जरुर सांगेन.”

हेही वाचा : “नवरा हाच हवा…”, अक्षरा-अधिपतीच्या गाण्यावर नारकर जोडप्याचा सुंदर डान्स! शिवानी रांगोळे कमेंट करत म्हणाली…

माधुरी पुढे म्हणाली, “मी एका चित्रपटाच्या मिटींगसाठी गेले होते. त्यावेळी मिटींग सुरु झाली… सुरुवातीला आम्ही सगळेजण एकत्र बसलो होतो. त्यानंतर अचानक एक व्यक्ती आत आली आणि मला सांगितलं तुम्ही थोडं त्या सर्कलमधून जरा बाहेर बसा. माझी खुर्ची त्या व्यक्तीने बाहेर काढली. त्यानंतर मी त्या सर्कलच्या बाहेर होते…मला वेगळं बसवलं आणि मिटींगसाठी एक सर्कल तयार झाला. त्यावेळी असं वाटलं ती मिटींग फक्त त्यांच्यासाठी सुरु आहे, तर मग मला बोलावलं? खरंच मला त्या चित्रपटात काम देणार का? मला त्या भूमिकेबद्दल सांगण्यासाठी बोलावलंय का? असे अनेक विचार मनात आले आणि ती गोष्ट माझ्या मनाला खूप लागली.”

हेही वाचा : ‘नवरा माझा नवसाचा २’ मध्ये कोणती अभिनेत्री झळकणार? डबिंगचा व्हिडीओ आला समोर, नेटकरी म्हणाले…

“आपण सगळे एकत्र चर्चा करत असताना एक खुर्ची सामावून घेऊन बसू शकलो असतो. बाहेरच्या व्यक्तीला आपण आत घेऊ शकतो पण, त्या लोकांनी हे केलं नाही. त्यामुळे अशी एखादी मिटींग असेल किंवा एखादी भूमिका साकारायची असेल तेव्हा आपण आउटसायडर आहे असं अनेकदा जाणवतं. आपण एखादी भूमिका करण्यासाठी कितीही सक्षम असू तरीही दिल्या जात नाहीत. मला असं वाटतं की, जरीही तुम्ही इंडस्ट्रीमधले नसाल, आउटसायडर असाल आणि तुमच्यात टॅलेंट असेल तर कितीही असे अनुभव आले तरीही आपण जिद्द न सोडता ठामपणे आपली भूमिका घेतली पाहिजे. एक दिवस नक्की येईल जेव्हा आपल्याला न्याय मिळेल. कारण, आतापर्यंत ज्या चांगल्या कलाकृती घडल्या आहेत त्या अशाच गोष्टीतून घडत असतात. माझ्याबद्दल सांगायचं झालं, तर आउटसाइडर अशी वागणूक मला अनेकदा मिळाली आहे आणि खूप चांगल्या चांगल्या लोकांकडून मिळाली आहे. पण, या सगळ्या गोष्टी मी आयुष्यात प्रेरणा म्हणूनच घेतल्या आहेत.” असं माधुरी पवारने सांगितलं.