अलीकडच्या काळातील सगळेच सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील आनंदाचे क्षण हे कलाकार नेहमीच चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. मराठी कलाविश्वातील अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीने प्रेक्षकांना गुडन्यूज दिली आहे.

‘ख्वाबों के परिंदे’, ‘यारीया २’ यांसारख्या हिंदी चित्रपटांसह ‘ऑटोग्राफ’, ‘बुगडी माझी सांडली गं’ या मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी मोघे वयाच्या ३३ व्या वर्षी आई झाली आहे. अभिनेत्रीच्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालं आहे. मानसी व तिच्या पतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज त्यांच्या सर्व चाहत्यांना दिली आहे. काही दिवसांपूर्वी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचं औचित्य साधत मानसीने हटके फोटोशूट करत गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं.

११ मार्च रोजी मानसीच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. मानसी व सूर्या शर्मा यांना मुलगा झाला आहे. “आज आमचं मन आनंदाने भरून आलं आहे. तुम्ही सर्वांनी दिलेलं प्रेम आणि शुभेच्छांसाठी खूप खूप आभार. आमच्या बाळाला लवकरच तुम्हा सगळ्यांसमोर आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.” अशी पोस्ट या जोडप्याने शेअर केली आहे. या पोस्टसह त्यांनी पालकत्व, बेबी बॉय, आमचं कुटुंब असे हॅशटॅग देखील शेअर केले आहेत.

मराठमोळ्या मानसी मोघेने २०१३ मध्ये ‘मिस Dive युनिव्हर्स’ हा खिताब देखील जिंकला होता. अभिनेत्री ( Manasi Moghe ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या पतीसह ती अनेक नवनवीन जागांवर भ्रमंती करताना दिसते.

मानसी मोघेने २०२३ मध्ये हिंदी अभिनेता सूर्या शर्माशी लग्नगाठ बांधली. ‘अनदेखी’, ‘ये काली काली आँखे’, ‘होस्टेजेस’, ‘ब्राउन’ अशा लोकप्रिय सीरिजमध्ये सूर्या शर्माने काम केलेलं आहे. मानसी आणि सूर्याचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला होता. दरम्यान, सध्या मनोरंजन विश्वातून मानसी मोघे आणि सूर्या शर्मा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

Story img Loader